पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/१२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जास्त चांगली वाढलेली दिसतात. त्यांची उंची, घेर, सरळसोटपणा यामुळे त्यांना खास किंमत येते. चंद्रपूर जिल्ह्यात आलापल्लीजवळ अशी दृष्ट लागण्याजोगी झाडे· आहेत. त्यांना 'ग्लोरी ऑफ आलापल्ली' (आलापल्लीची शान ) असे काव्यात्म नाव मिळाले आहे. पुण्यातील राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळेचे पूर्वीचे संचालक डॉ. बी. डी. टिळक यांच्या प्रोत्साहनाने अशा वृक्षांच्या पेशींपासून त्यांचे सर्व गुणधर्म अंगभूत असलेली रोपे तयार करण्याचे प्रयत्न झाले. पण ते अजून व्यवहारात वापरले गेलेले दिसत नाहीत.
 प्राण्यांबाबत हे तंत्र फारसे उपयोगी पडलेले नाही. त्यांच्याकरता आणखी एक तंत्र शास्त्रज्ञांनी सुचवले आहे. यात एका फलित न झालेल्या अंडयाचा केंद्रभाग आणि त्यातील रंगसूत्रे अतिनील किरणांच्या मान्याने नष्ट केली जातात. त्याजागी आपल्याला हव्या त्या पेशीचा केंद्रभाग बसवला जातो. आता हे अंडे फलित झाल्या- सारखे वागू आणि बाढू लागते. यातून त्या दुसऱ्या पेशीचे सर्व गुणधर्म घेऊन नवा जीव जन्माला येतो. हे तंत्र बेडकांमधे प्रायोगिकरीत्या यशस्वीपणे वापरण्यात आले आहे. ते प्रगत झाले तर पुढेमागे आपण हव्या त्या प्राण्याचे जुळे भावंड आपण बनवू शकू. कदाचित पुढेमागे ते माणसातही वापरता येईल.

 वनस्पती, प्राणी यांच्यात आपल्याला हवे तसे गुणात्मक फरक योजनापूर्वक घडवून आणणाऱ्या माणसाने स्वतःबाबत असा प्रयत्न न केला तरच आश्चर्य या प्रयत्नाचे दोन भाग आहेत. एक म्हणजे मुले होत नसतील तर होण्यासाठी उपाय करणे आणि होत असतील तर ती अधिकाधिक गुणवान कशी घडतील याचा विचार करणे. महाभारतामधे कुंतीला लग्नापूर्वीच सूर्यापासून मुलगा झाल्याची कथा आहे. लोकाप- बादाच्या मीतीने तिने कर्णाचा त्याग केला. पण लग्नानंतर पत्तीपासून अपत्यसंभव होणार नाही असे कळल्यावर तिने आपल्या लग्नपूर्व अनुभवाचा पुन्हा एकदा नव्हे तीनदा, उपयोग करून घेतला. एवढेच नव्हे तर सवतीलाही हाच कानमंत्र दिला. कुंतीच्या आधीच्या पिढीत भीष्माने, सावत्र भावाकरता पळवून आणलेल्या तीन राज- कन्यांना अपत्यप्राप्ती व्हावी यासाठी, एका तेजस्वी ऋषीची मदत घेतली होतीच. इजिप्तच्या फारोह राजघराण्यात, जुन्या पिढीचे सर्व गुण नव्या पिढीत यावेत यासाठी सख्ख्या भावाबहिणीचाच विवाह लावून दिला जात असे.

९४ / नराचा नारायण