पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/१२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

म्हशी घेऊन या जंगलात शिरले आणि तिथल्या गवतावर चरून म्हशींनी उत्तम दूध दिले. गवळ्यांना सुखाचे दिवस आले. आपले मलेरिया निमूर्लनाचे प्रयत्न देशभरच इतके यशस्वी झाले की, हे खाते बंद करण्याची वेळ आली. पण आता चक्रं पुन्हा मूळ पदावर येत आहे. आता डास डीडीटीला दाद देत नाहीत. डीडीटी पचवणारा गुणबदल झालेले डास अफाट वाढत आहेत आणि त्यांच्याबरोबर मलेरियाही. तो किती वाढतोय याचा नेमकेपणाने अंदाज करणेही अजून जमलेले नाही. पण तज्ज्ञांच्या मते वेळीच हालचाल करण्याची गरज आहे. म्हणजे नेमके करायचे काय ? एक उपाय म्हणजे डासांची वीण न होऊ देणे. याकरता 'स्टराइल मेल' तंत्र वापरण्याजोगे आहे. यामंधे नर कीटकांवर गॅमा किरणांचा मारा करायचा. फार तीव्र नाही. नाहीतर ते मरूनच जायचे. डोस असा ठेवायचा की, नर नपुंसक झाले पाहिजेत. बऱ्याच कीटकांमधे मादीचा नराशी एकदाच समागम होतो. त्यावेळी मिळालेले शुक्रजंतू ती पुरवून पुरवून वापरते. हा समागम जर नपुंसक नराशी झाला तर तिची अंडी फलित होत नाहीत. असे नर सतत निर्माण करून मोकळे सोडले तर कीटकांची संख्या घटत जाते. हे तंत्र अमेरिकेमधे शेळ्या, मेंढ्या, गाई यांना छळणाऱ्या स्क्रूवर्मफ्लाय नावाच्या कीटकावर यशस्वीपणे वापरले गेले आहेत. डासां- विरुद्ध ते वापरण्यात आपल्याला यश आलेले नाही.

 ' स्टराइल मेल' तंत्राने नतद्रष्ट जीव घटवता येतात, तर 'क्लोनिंग' हे तंत्र वापरून उपयुक्त जीव झपाट्याने वाढवता येतात. संकरित जातीकरता पुन्हा पुन्हा नवे बियाणे तयार करण्याऐवजी हवे ते गुणधर्म असलेल्या जीवाच्या एका पेशीपासून अनेक पेशी आणि शेवटी दुसरा जीव का घडवता येऊ नये? कलमे करताना एका अर्थाने हेच घडते. हापूस आंब्याची डहाळी साल सोलून गावरान आंब्याच्या फांदीला बांधून वर शेण, चिखल असे मिश्रण चापले तर त्या दोन डहाळ्या जुळतात. हापूस आंब्याची डहाळी बाढू लागते. तिला आपल्या सर्वांना आवडणारी फळे लागतात. गुलाबामधेही सर्रास कलमे करतात. यात गावरान गुलाबाची जोरदार मुळे अन्न गोळा करण्याच्या कामाला लावून जातवान मिळवता येतात. क्लोनिंग किंवा टिश्यू कल्चर तंत्रामधे जातवान रोपाच्या पेशींची प्रयोगशाळेत वाढ करतात. साम हे आपल्या जंगलातले सर्वांत मूल्यवान झाड. त्यातसुद्धा काही निवडक झाडे इतरांपेक्षा

सुप्रजाजमन / ९३