पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/१२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जरा वासबीस येतो दुधाला, पण चालवून घेता येते. करडे विकून, बोकड विकून चार पैसे मिळतात.अशी आपल्या शेळीची कथा.दरिद्रीनारायणाच्या कवडीदमडीच्या हिशोबाची.तरी जंगलवाल्यांचा आणि इतरांचा बिचारीवर राग ! शेळीमुळे जंगला- तल्या बालतरूंचे आयुष्य धोक्यात येते.ती निसर्गात फार नासाडी करते.तिला बांधून ठेवून जागीच खायला घातले पाहिजे.म्हणजे दुसन्या कोणीतरी रोज तिच्यासाठी चारा आणला पाहिजे. ते परवडत नाही.विकतचे पशुखाद्य तर त्याहून परवडत नाही.कारण तिला तेवढे दूध नाही.दूध नाही म्हणून चारा नाही आणि चारा नाही म्हणून दूध नाही.हे दुष्टचक्र तुटणार कसे? इथेही सुप्रजाजननाचा प्रयत्न करणे शक्य आहे.परदेशात शेळ्यांच्या जास्त दूध देणाऱ्या जाती असतील त्यांचे बोकड आयात करायचे.पुण्याजवळ नारायणगावच्या श्री. सबनीस या गृहस्थांनी इस्राएलहून असे सायनेन जातीचे बोकड आणवले आहेत.या संकरातून जन्मलेले बोकड पैदाशी - साठी शेतकरी विकत घेतात.संकरित शेळ्या चार-पाच लिटर इतके दूध देऊ शकतात. अर्थात खाणेही तसेच हवे.पण हे दूध विकायचे असेल, तर त्याला वास येता कामा नये.एक तर्क असा आहे की, बोकडाच्या सान्निध्यामुळे शेळीला लैंगिक उत्तेजन मिळून तिच्या शरीरात काही रसायने निर्माण होतात आणि त्यांचा परिणाम होतो आणि दुधाला वास येतो. यावर उपाय म्हणजे शेळीला जनान्यात ठेवणे आणि बोकड शेतात बांधणे.संकरित गोपैदाशीइतका हा प्रयोग प्रसिद्ध झालेला नाही.

 कोंबडी हा असाच अत्यंत उपयोगी पाळीव पक्षी.निसर्गतः कोंबडीचे अंडी घालणे.फार मर्यादित असते.कारण अंडी उबवून पिल्ले मोठी करायची असतात.बहुतेक सगळेच पक्षी कुटुंबनियोजन करतात हे आपण पाहिलेच आहे. तेव्हा वर्षाचा बराच काळ कोंबडी खुडुक असते.पण माणसाला हवे अंडी आणि मांस देणारे यंत्र !कोंबडीमधले स्वतःची अंडी उबवणे, पिल्लांची काळजी घेणे वगैरे गुण लोपले तरी चालतील, पण तिने सतत अंडी घातली पाहिजेत.अशी जात निर्माण झाली आहे. पण ती हायब्रीड आहे.त्यामुळे पिकांच्या बाबतीत जसा बियाण्याचा धंदा, तसा या बाबतीत पिल्ले विकण्याचा धंदा जोरात आहे.बडया कंपन्यांना अंडी विकण्यात रस नाही.ते काम शेतकन्यांनी किंवा अन्य कोणी करावे.त्यांना जातिवंत कोंबड्या ( १ दिवसाची पिल्ले ) विकणार, त्या या बड़या कंपन्या.ही पिल्ले म्हणजे F1 पिढी.

सुप्रजाजनन / ९१