पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/११८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अंडी, मांस, कातडी, लोकर, मध, रेशीम या गोष्टी पाळीव प्राण्यांपासून मिळतात. श्रमाची कामे करण्यासाठीही त्यांचा उपयोग होतो. गाय, म्हैस, घोडा, डुक्कर, शेळी,मेढी, गाढव, उंट, कोंबडी, बदक, कुत्रा, मांजर, कबुतर, पोपट, हत्ती, रेशीमकिडा, मधमाशी असे अनेक प्राणी माणसाने यशस्वीपणे पाळले आहेत.

 आज भारतात गाय आणि कोंबडी यांच्या सुप्रजाजननाचे प्रयत्न मोठ्या प्रमाणावर आहेत. भारतात माणसांच्या संख्येच्या जवळपास तिसरा हिस्सा इतके प्रचंड गोधन असून दुधाची वानवा आहे. भारतीय गायींच्या बऱ्याच जाती पशुखाद्याचे दुधात रूपांतर करणारी यंत्रे म्हणून पुरेशा उपयोगी नाहीत. त्यांचे दूध वाढले पाहिजे. त्या लवकर वयात आल्या पाहिजेत. यासाठी प्रत्येक पिढीतील चांगल्या गाई आणि चांगले बैल निवडून त्यांच्यापासून पुढील पिढी निर्माण करणे आणि इतर जनावरांना पुन- रुत्पत्ती न करू देणे हा एक मार्ग आहे. पण या मार्गाने होणारी प्रगती फार सावकाश असते. तसेच यातून होणाऱ्या प्रगतीला मर्यादा आहेत. बेडकी फुगून किती फुगणार ? बैलाएवढी होणार नाही. दुसरा उपाय म्हणजे संकरित गाय निर्माण करणे. युरोपातील होलस्टीन, फ्रीझियन, जर्सी वगैरे गुणी जाती त्याकरता वापरणे. हे करण्याचा मार्ग म्हणजे अशा जातीचे वळू आणून त्यांचा देशी गायींशी प्रत्यक्ष समागम घडवणे. पण हे वळू फार महाग असतात. त्यांची बडदास्त फार ठेवावी लागते. त्यांच्यापासून किती कालवडी निर्माण होणार याला मर्यादा पडते. ही 'इंपोर्टेड' जनावरे खेड्या- पाड्यांपर्यंत पोचवता येत नाहीत. याला पर्याय म्हणजे कृत्रिम रेतन गुणवंत वळूंचे वीर्य गोठवून ठेवले तर बरेच दिवस वापरता येते. या वीर्यामधे आधी दूध किंवा अंड्याचा बलक मिसळून ते वाढवतात. नंतर त्यात रोगप्रतिबंधक औषधे मिसळतात. शेतकरी बियाण्याला औषध चोळतो त्याप्रमाणेच. त्यानंतर ते मिश्रण गोठलेल्या कार्बन- डाय-ऑक्साइडमधे ( सुका बर्फ ) - ७९° सेंटिग्रेड तपमानाला ठेवतात किंवा हल्ली द्रवरूप नायट्रोजनमधे - १९७° सेंटिग्रेड तपमानाला ठेवतात. गाय माजावर आली की, यातल्या छोट्या डोसचा वापर करून कृत्रिम रेतन करतात. या पद्धतीमघे वळूच्या एका वीर्यपतनातून मिळणाच्या शुक्रजंतूंपासून अनेक गाईंना गर्भधारणा होऊ शकते.एक बळू त्याच्या गोठ्यातून बाहेरसुद्धा न पडता अक्षरशः हजारो कालबडी निर्माण करू शकतो. इतक्या मोठ्या प्रमाणावर ज्याची वंशवृद्धी होणार त्याच्यामचे हवे

सुप्रजाजनन / ८७