पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/११५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आपल्याला माहीत असली म्हणजे झाले.
 गव्हाच्या नव्या जाती घडवण्याचे काम अजूनही चालूच आहे. १९८३ साली अमेरिकेतील मिझुरी विद्यापीठातल्या जेम्स वोर्टेल या शास्त्रज्ञाने दावा केला की, त्याला नेहमीच्या दुप्पट प्रथिनांश असलेली गव्हाची जात बनवण्यात यश आले आहे. सध्या उपलब्ध गव्हाच्या जातींमचे प्रथिनांचा अंश १३-१४ टक्क्यापेक्षा जास्त नसतो. या नव्या जातीत तो २६३ टक्के आहे. इस्राएलमधील एक गहू आणि इराण-अफगाणि- स्तान या भागातील एक गवत यांच्या संकराने तो बनला आहे. इस्राएली गव्हात रंगसूत्रांच्या १४ जोड्या असतात, तर इराणी गवतात २१. संकरामधे ३५ रंगसूत्रे येतात ( जोड्या नव्हे ). त्यावर कोल्चिसिनची क्रिया करून रंगसूत्रांच्या ३५ जोडया करता येतात. अजून या गव्हाच्या लोंब्या नीट घरत नाहीत. दाणे पडून जातात. म्हणजे त्यांचा जंगलीपणा थोडा घटायला हवा.

 शेतीच्या पिकांमधे सुप्रजाजनन कसे चालते हे आपण पाहिले. जंगलांच्या व्यव- स्थापनामधे वृक्षवल्लींच्या सुप्रजाजनाचा प्रयत्न असतो. याचा एक भाग असा की, एकाच जातीच्या वृक्षांपैकी जास्त उपयुक्त वृक्ष शिल्लक ठेवून निरुपयोगी वृक्ष उखडून टाकायचे, गुणवान रोपे लावायची. रोगट झाडे तोडायची. जंगलखात्यामधे' सिलेक्शन फेलिंग' (वेचक वृक्षतोड ) हा शब्द वापरतात तो मात्र बरोबर उलट अर्थाने. सिलेक्शन फेलिंग म्हणजे ज्यांची वाढ पूर्ण झाली आहे, ज्यांना रेल्वेस्लिपर्स, जहाजे, फर्निचर वगैरे बनवण्यासाठी मागणी आहे ती झाडे वेचून तोडायची. म्हणजे हे कुप्रजाजनन होईल. पण वृक्षांच्या एकेका पिढीचे दीर्घायुष्य लक्षात घेता अशा तोडीचा वृक्षांच्या जीन्सवर परिणाम होण्याला पाचपन्नास पिढ्या म्हणजे सागाच्या बाबतीत तीनचार हजार वर्षे तरी जायला लागतील. आणि तोपर्यंत बाकीचे अनेक संदर्भ बदलून जातील. काही आधीच बदलले आहेत. आपली लोकसंख्या वाढती आहे. गेल्या तीस वर्षांत ती दुप्पट झाली आहे. कारखान्यांची लाकडाची गरज वाढत आहे. जंगलांच्या जागी शेती येत आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे वेचक तोड करून गरज भागत नाही. मग दुसरा उपाय म्हणजे जंगलातील एकंदर वृक्षसृष्टीत आपल्याला हव्या त्या जातीचा प्रसार करणे आणि त्यासाठी नको त्या जातींना हुसकावून लावणे, अन् मोकळी जागा मिळवणे. अशा प्रयत्नातून आपण जंगलांचा चेहरामोहराच बदलून

८४ / नराचा नारायण