पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/११३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

उचलते. निंबकर सीडससारख्या काही खाजगी कंपन्यासुद्धा या धंद्यात आहेत. ही सर्वच मंडळी बहुतेकदा खाजगी शेतकऱ्यांना बियाणाचे प्लॉट देतात. म्हणजे या कंपन्यांच्या किंवा सरकारी अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली शेतकऱ्याने फुलांचा संकर घडवून आणायचा. सर्व पीक सरकारने किंवा कंपनीने ठरलेल्या भावात विकत घ्यायचे मग आपला शिक्का मारलेल्या पिशव्यातून ते शेतकऱ्यांना विकायचे. या हायब्रीड तंत्रामुळे इतकी उत्पादनवाढ झाली की, आपण तिला हरितक्रांती असे म्हणू लागलो.
 अर्थात असा संकर घडवून आणणे ही फार सोपी गोष्ट नाही. बरेचदा संकरातून घडणारे रोप वांझ असते. काही वेळा त्याला मिळालेल्या एकूण रंगसूत्रांच्या नीट जोड्या जमत नाहीत. त्यामुळे बीजपेशी बनण्यात अडचण येते. या कोंडीतून सुटण्याचा एक मार्ग माणसाला निसर्गात सापडला. अपघाताने पेशीच्या केंद्रभागात प्रत्येक रंगसूत्राची जादा प्रत बनवली जाते, पण पेशीचे विभाजन होत नाही. समजा, 'अ' वनस्पतीत १८ रंगसूत्रे ( ९ जोड्या ) आहेत आणि 'ब' वनस्पतीत १२ रंग- सूत्रे ( ६ जोड्या) आहेत. यांच्या संकरामधे ' अ 'कडून ९ रंगसूत्रे येतील तर ' ब ' कडून ६. संकरित पेशीमधल्या १५ रंगसूत्रांच्या जोड्या कशा तयार होणार ? एक रंगसूत्र सुटे राहणारच. योग्य जोड्या जमल्या नाहीत तर पेशी विभाजनाची प्रक्रिया थांबणार. आता या १५ रंगसूत्रांची ३० झाली, तर मात्र प्रत्येक रंगसूत्राला जोडीदार लाभेल. पुढची पिढी बनण्याचा मार्ग मोकळा होईल. निसर्गात असे घडल्याची उदा- हरणे सापडली आहेत. प्रयोगशाळेत अशी प्रक्रिया घडवून आणण्यासाठी कोल्चिसिन या रसायनाचा उपयोग करतात. गव्हाच्या बाबतीत त्याची वारंवार गरज पडली आहे.

 माणसाने गव्हाची पैदास सुमारे दहा हजार वर्षांपूर्वी सुरू केली असावी. ती बहुधा सीरिया, इस्राएल वगैरे भागात असावी. हा गहू जंगली गवतांच्या संकरापासून बनला असेल. मुळातल्या गव्हामधे १४ रंगसूत्रे होती. त्याचा आणखी एका गवताबरोबर संकर झाला आणि रंगसूत्रांची संख्या दुप्पट होऊन हे संकरित रोप पुनरुत्पत्तीला योग्य झाले. यात २८ रंगसूत्रे आहेत. मूळच्या गव्हाला डिप्लॉइड ( रंगसूत्रांच्या जोडा असलेला) तर दुसऱ्याला टेट्राप्लॉइड (रंगसूत्रांच्या चौकड्या, चार रंगसूत्रांचे सात गट) असे म्हणतात. याचा पुन्हा एकदा जंगली गवताशी संकर होऊन हेक्शा- प्लॉइड (सहा रंगसूत्रांचे सात गट ) गहू बनला. आज जगात हा गहू सर्वात जास्त

८२ / नराचा नारायण