पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/१११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हलके तंतू जोडून तयार केलेले जणू पॅराशूट ! असो. तर हा मूळचा गुणधर्म असला तरी गुणबदलाने मधूनच काही रोपांमधे बी तयार झाल्यावरही लोंब्या उघडल्या जात नसतील, अशा पोटजाती खरे तर निसर्गतः संपायच्याच. पण माणसाला या लोंब्या सोयीच्या झाल्या असतील. अशा लोंब्यांचे आवर्जून गोळा केलेले दाणे गुहेकडे नेता नेता वाटेत सांडले असतील. हळूहळू माणसाच्या वहिवाटीच्या जागांवर लोंब्या न उघडणाऱ्या रोपांचीच भाऊगर्दी उडाली असेल. हा आहे तर्कच. पण तो खरा अस- ण्याची शक्यता बरीच वाटते.
 शेतीचे तंत्र गवसल्यानंतर माणसाची, अन्नासाठी दाही दिशा ही स्थिती बदलली असेल. आता राह्यली मुख्यत्वे शेतीची दिशा. अनुभवातून माणसाने शेतीच्या तंत्रात अनेक सुधारणा केल्या. आलेल्या पिकांपैकी खास, टपोरे, तेजस्खी दाणे तो बियाणे म्हणून वापरू लागला. पिकाच्या प्रत्येक पिढीमधे माणसाला पसंत पडलेल्या रोपांचाच वंश वाढू लागला. आजही शेतीच्या आधुनिक तंत्रामधे, हव्या त्या गुणधर्मांनी युक्त अशी रोपे वेगळी काढण्याला महत्त्वाचे स्थान आहे. आज शेतकऱ्याला पिकात कोणते गुण हवे असतात ? भरपूर उत्पादन, रोगप्रतिकार शक्ती, पीक लवकर कापणीला येणे, चांगला रंग, चांगली चव, दुष्काळाला तोंड देण्याची क्षमता (ओल्या नि कोरड्या), जनावरांना आवडणारा कडबा वगैरे. अशी सर्वगुणसंपन्न आखूडशिंगी, बढुंदुधी गाय अर्थातच मिळत नाही. एक बाजू पक्की असेल तर दुसरी अधू असते. ज्या जातीचे पीक भरपूर तिची चव बेताची. कोरड्या दुष्काळाला तोंड देणारी जात पाऊस चांगला झाला तरी भरघोस उत्पन्न देत नाही. पण त्यातल्या त्यात निवडत राहायचे. ते कसे ?

 समजा, आपल्याला कापसाच्या पिकात रस आहे. आपण एक विशिष्ट गावरान जात लावतो. पण गेले दोन-तीन हंगाम कसल्यातरी बुरशी रोगाने पीक हातातून जात आहे, मग काय करायचे ? आपल्या पिकाच्या जातीची, त्या रोगाला तोंड देऊ शकणारी पोटजात शोधायची. शास्त्रज्ञ हा उद्योग बरेचदा करतात. शेतात हा बुरशी रोग मुद्दाम पेरायचा. मग बहुतेक रोपे मान टाकतात. पण टक्का दोन टक्के उरतात. यातली काही नशिबाने वाचली असतील तर काहींमधे गुणबदलाने त्या बुरशीला टक्कर देण्याची क्षमता निर्माण झाली असेल. या रोपांची सरकी काढून पुन्हा पेरायची.

८० / नराचा नारायण