पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/११०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भटकणाऱ्यांबद्दल ऐकलंय का तुम्ही ? दक्षिण भारतात ही मंडळी आहेत. भातकापणी झाली की, शेतात ही बदके न्यायची. ती पडलेले दाणे वेचून खातात. शेतकऱ्यालाः थोडे बहुत खत मिळते आणि मालकाला अंडी ! माणसाला वेचता न येणारे अन्नकण वेचणारे यंत्र म्हणूनच या बदकांचा उपयोग केला जातो असे म्हणायला हरकत नाही. ज्या प्राण्यांनी माणसाशी जुळवून घेतले त्यांना माणसांकडून अभय मिळाले. कुत्र्याचेच उदाहरण घ्या. माणूस आणि कुत्रा यांची जी दोस्ती झाली तिच्यात कुत्र्या- चाच पुढाकार असण्याची शक्यता आहे. प्रथम माणसाच्या भटक्या टोळ्यांच्या मागोमाग त्यांचे उरले-सुरले खाण्यासाठी हा प्राणी हिंडू लागला असेल. मग त्याच्या- मुळे रात्री जाग राहून माणसाला वस्तीवर होणाऱ्या अचानक हल्ल्याचा इशारा मिळू लागला असेल. काही असो. ही जोडी बनली खरी. आज कुत्र्याच्या जातीशी थोडे फार साम्य असलेले कोल्हा, लांडगा वगैरे प्राणी संपत आलेत. पण कुत्र्याला धोका नाही.

 प्राण्यांना पाळले तसे माणसाने वनस्पतींनाही पाळले. म्हणजे तशी फळे, पाने, फुले खाण्याची वहिवाट माकडांमधेही आहे. पण शेतीची नाही. माकडांमधे नसली तरी काही मुंग्यांमधे शेती आणि पशुपालनाची पद्धत आढळते. एका जातीच्या मुंग्या पानांचे तुकडे करून वारुळात साठवतात अन् त्यावर बुरशी वाढवून ती खातात. दुसऱ्या जातीच्या मुंग्या एफिडस नावाच्या किड्यांना वारुळात ठेवतात, त्यांना खाऊ घालतात आणि त्यांच्यापासून निघणारे स्त्राव दुधासारखे सेवन करतात. तांदूळ, गहू, ज्वारी ही तृणधान्ये आज मुख्यत्वाने आपली दुपारची वेळ भागवतात. ही माणसाळवली कशी गेली असतील ? या मुळातल्या गवताच्या जाती. गवताचे बी हे अनेक किडे आणि पाखरे यांचे अन्न आहे. पण ते बी फार लहान असेल तर माणसाला ना दिसणार, ना वेचता येणार. तेव्हा तुलनेने मोठे बी असलेले गवत माणसाच्या नजरेस प्रथम भरले असेल. मोठे जरी झाले तरी बी वेचणे जिकिरीचेच. मग माणसाने हुशारी करून ते बी लोंब्यांमधून खाली पडायच्या आत गोळा करायला सुरुवात केली असेल. गवताचा स्वभावधर्म म्हणजे बी पक्व झाल्यावर ते उधळून देणे. म्हणजे ते उगवून वंशवृद्धी व्हायला बरे. हे बी पसरवण्याच्या निसर्गात किती म्हणून तन्हा ! वान्यावर उडणाऱ्या सावरीच्या म्हाताऱ्या म्हणजे एकेका बीसाठी पांढरे, तलम,

सुप्रजाजनन / ७९