पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/१०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

घेतो. शेवटी सावज थकून पडते, शिकार होते. यातून प्रत्येक कुत्र्याला तो एकटा शिकार करत असता तर जितके अन्न मिळाले असते त्यापेक्षा जास्त अन्न मिळते. पक्षी एकत्र वस्ती करतात, कारण त्यात प्रत्येकाचा फायदा होतो म्हणून. एकमेका- कडून धोक्याचे इशारे मिळतात, अन्नसाठ्याची माहिती कळते, संरक्षण मिळते वगैरे. हजारो पेंग्विन पक्षी जवळपास एकाच वेळी एका मैदानात अंडी घालतात. याचे एक कारण म्हणजे स्कुआ पक्षांसारखे भक्षक अंडी खायला येतात तेव्हा गटाबरोबर अंडी घालणाऱ्या मादीची अंडी वाचण्याची शक्यता खूपच जास्त असते. मागे पुण्याजवळ वीर धरणापाशी माझ्या एका मित्राने प्रायोगिक शेती केली होती. त्याला पाटाचे पाणी मिळत होते. त्याने हंगामाच्या महिनाभर आधी ज्वारी पेरली. साहजिकच इतर शेत- कऱ्यांच्या महिनाभर आधी त्याच्या ज्वारीची कणसे दाण्यांनी भरू लागली. पण दुर्दैवाने पंचक्रोशीतील सर्व पक्ष्यांनी एकजुटीने या शेतावर हल्ला केला. सरासरी इतकेही पीक त्या मित्राच्या हाती आले नाही. त्याचे शेत गावातील इतर शेतांबरोबरच केले असते तर दाणे टिपणारे पक्षी सगळ्याच शेतांमधे वाटले गेले असते.

 ' पेकिंग ऑर्डर' हा प्रसिद्ध इंग्रजी वाक्प्रचार कोंबडयांच्या अभ्यासातून निर्माण झाला असावा. एका शास्त्रज्ञाला आढळून आले की, अनेक कोंबड्यांना मिळून खायला घातले तरी त्या विशिष्ट क्रमानेच खातात. कोणी आपल्या ठरलेल्या क्रमांकाच्या आधी खाऊ पाहील तर त्याला चोचीचे फटकेच खायला मिळतात. मागाहून येणारे आधी येणाऱ्यांसाठी त्याग करत नसतात किंवा उदात्त सहकार्याची भावनाही तेथे नसते. इजा टाळून त्यातल्या त्यात जास्त अन्न मिळवणे ही गोष्ट आपल्या क्रमांकाला चिकटून राहण्यामुळेच शक्य होते.

तुझ्यावाचून करमेना / ७७