पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/१०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

निम्म्या (सरासरी ) सामाइक असतात. असा ७५ टक्के हा आकडा होतो. तेव्हा स्वतःच्या मुली वाढवण्यापेक्षा स्वतःच्या बहिणी वाढवणे हे जीन्सच्या प्रसाराला जास्त अनुरूप ठरते.
 एकूण असे दिसते की 'कीन सिलेक्शन 'च्या सिद्धांतानुसार प्राणी जगतातील त्याग हा शेवटी त्या त्या प्राण्याच्या जीन्सचा अधिकाधिक प्रसार होण्याला उपयोगी पडणाराच असतो. वाटल्यास, याला जीन्सची दूरदृष्टी म्हणावे.
 त्यागाप्रमाणेच निसर्गातील कुटुंबनियोजनाचेही स्पष्टीकरण देता येते. डेव्हिड लॅक या ब्रिटिश पक्षीतज्ज्ञाला असे आढळले की, पक्ष्यांच्या प्रत्येक जातीत एका वेळी किती अंडी घालायची हा आकडा जवळपास पक्का ठरलेला असतो. स्वतःच्या जीन्सच्या प्रसारासाठी प्रत्येक पक्षीण अधिकाधिक अंडी का घालत नाही ? संख्या जास्त होऊन पक्षी जातीचे भवितव्य काळेकुट्ट बनेल या भीतीने काय ? मुळीच नाही. जास्त अंडी घातली तर त्या पिल्लांना खाऊ घालणे, त्यांचे रक्षण करणे हे नीट जमणार नाही. बालमृत्यू इतके होतील की शेवटी कमी अंडी घालणारी पक्षीण शहाणी ठरेल. तेव्हा आपल्या प्रौढत्वापर्यंत पोचणाऱ्या पिल्लांची संख्या जास्तीत जास्त व्हावी याकरता कमी अंडी घालणे उपयुक्त ठरते.
 आईबाप पिल्लांकरता त्याग करतात, याचे कारण पिल्लांमधे त्यांच्या निम्म्या जीन्स असतात असे प्रतिपादन आपण केले. पण पिल्ले मात्र आईबापांकरता तसा त्याग करताना दिसत नाहीत. याचे कारण पिल्ले मोठी होईतोवर आईबापांची जीन्सचा प्रसार करण्याची शक्ती क्षीण झालेली असते. त्यामुळे जाणूनबुजून जसे कोणी बुडत्या कंपनीचे शेअर विकत घेत नाहीत, त्याप्रमाणे उत्क्रांतीची प्रेरणा आईबापांसाठी कष्ट करण्यापेक्षा स्वतःचाच संसार उभारण्याला पिल्लांना उद्युक्त करतात. 'पुढच्या पिढी- करता आपण काही केले पाहिजे' या सर्वसामान्य कल्पनेला धक्का देऊन बर्नार्ड शॉ म्हणत असे, 'पुढच्या पिढीने माझ्यासाठी काय केले आहे ? ' डार्विनच्या उत्क्रांति- वादात या प्रश्नाचे उत्तर सापडते.

 पीटर क्रोपॉट किनने ज्या सहकाराचे वर्णन केले तोसुद्धा शेवटी अशा खार्थापोटी उद्भवला असेल असे प्रतिपादन करता येते. जंगली कुत्रे सहकार्याने शिकार करतात. एका वेळी एक कुत्रा सावजाचा पाठलाग करतो. तो दमला की, दुसरा त्याची जागा

७६ / नराचा नारायण