पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/१०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आपल्याला सहजी लक्षात येत नाहीत. बर्नार्ड शॉने म्हटले आहे की फक्त मातृत्व हे सत्य. पितृत्व हा केवळ अंदाज, तेव्हा प्राणी नात्याचे तपशील ओळखत असतील हे असंभाव्य. शिवाय, पुढच्या अंकगणिताचा भागही सोपा नाही. आपल्याला तोटा किती होणार आणि समोरच्या प्राण्याला फायदा किती होणार हे पाहून त्यांचे गुणोत्तर आपल्या दोघातील सामाइक जीन्सच्या प्रमाणापेक्षा जास्त आहे ना, हे ठरवणे सोपे नाही. पण निसर्गात प्राणी असल्या कुठल्याच उठाठेवी करत नाहीत. रंगसूत्रांनी आणि जीन्सनी ठरवलेले त्यांच्या वागणुकीचे प्लॅन्स अगदी साधे असतात. हल्लेखोर समोर दिसला की, इशारा दे, छोटे पिल्लू भुकेले दिसले की, त्याला दूध पाज. होते काय, की प्राणी अजाणतेपणे गोष्टी करत राहतो आणि त्यांचा हिशोब नीट जमला तर त्याची त्यागी जीन शिल्लक राहते. एरवी लुप्त होते. तेव्हा हेमिल्टनच्या 'कीन . सिलेक्शन ' चा अर्थ असा की, जिथे त्याग दिसतो तिथे कमी अधिक प्रमाणात रक्ताचे नाते असणार. ही गोष्ट तपासून पाहणे शक्य असते. या शोधात असे दिसून आले आहे की, एकमेकाला धोक्याचा इशारा देणाऱ्या प्राण्यांच्या टोळीत बहुतेक सर्वजण एकमेकांच्या नात्यातले असतात. कळपातील हत्तिणी बहुधा बहिणी असतात. एका पोळ्यातील मधमाशा किंवा गांधीलमाशा, एका वारुळातील मुंग्या या बहुधा एकमेकींच्या बहिणी असतात.

 हा विषय संपवण्यापूर्वी कामकरी मधमाशांबाबत पुन्हा एकदा विचार करू. या सगळ्याजणी स्वतःची पिलावळ वाढवण्याऐवजी राणी माशीच्या पिल्लांच्या खस्ता काढत असतात. याचा अर्थ त्यांच्या पिल्लांमधून त्यांच्या जीन्सचा जितका प्रसार झाला असता त्यापेक्षा राणीमाशीच्या पिल्लातून अधिक होत असला पाहिजे. हे कसे शक्य आहे ? पिल्लांमधे मातेच्या निम्म्या जीन्स असतात. उलट राणीमाशीच्या अंड्यातून बाहेर पडणाऱ्या माद्यांमधे सरासरी कामकरी माशीच्या एकूण जीन्सपैकी -७५ टक्के जीन्स असतात. यांचे कारण या कीटकांमधील खास अनुवांशिकता. यांच्यातील नर फलित न झालेल्या अंड्यांपासून बनतात. म्हणजेच त्यांच्यामधे निम्मीच रंगसूत्रे असतात. नरांच्या बीजपेशीमधे ही सर्व रंगसूत्रे उतरतात. म्हणजेच दोन बहिणींना त्यांच्या बापापासून मिळणारी सर्व रंगसूत्रे सारखीच असतात. या ५०% सामाइक जीन्स झाल्या. शिवाय आईकडून त्या दोघींना मिळणाऱ्या जीन्सपैकी

तुझ्यावाचून करमेना / ७५