पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/१०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कुटुंबावर परिणाम होईल असे तो म्हणतो. पुढे रोनाल्ड फिशरने घेवडयाच्या एकाच शेंगेतील वेगवेगळे दाणे एकमेकांशी अमर्याद स्पर्धा करणार नाहीत, कारण ती सक्खी भावंडे आहेत अशी मांडणी केली. हॅमिल्टनने याचे व्यवस्थित गणित मांडले.
 जो प्राणी दुसन्याला धोक्याचा इशारा देण्यात वेळ घालवतो, त्याला स्वतःला पळून जायला वेळ कमी मिळतो. त्याची लपण्याची जागा शिकान्याला सापडण्याची शक्यता वाढते. जो प्राणी दुसऱ्याच्या पिल्लांना अन्न देतो, त्याच्या स्वतःच्या पिल्लांना कमी मिळते. यातून या त्यागी प्राण्याच्या जीन्स घटतात. म्हणून एक गट त्यागी आणि एक गट स्वार्थी असे एकत्र राहत असले तर प्रत्येक पिढीमधे त्यागी जीवांचे प्रमाण कमी कमी होत शेवटी अदृश्य होणार, उत्क्रांतिवादात या तर्कटातून सुटका नाही. पण समजा हस्ते परहस्ते तुमच्या जीन्सचा प्रसार झाला तर ? तो कसा ? समजा दोन भाऊ एकमेकाशेजारी घरटी करून राहतात. एका भावाच्या मदतीकरता दुसरा त्याग करतो. दुसयाच्या वंशवृद्धीत घट येते. पण त्याच्या भावाच्या वंशवृद्धीला हातभार लागतो. आणि दोन भावांमधे सरासरी निम्म्या जीन्स सामाइक असतातच. किंवा दुसया भावांच्या शरीरातील त्यागी वृत्तीची जीन पहिल्या भावातही असण्याची शक्यता ५० टक्के असते. त्यामुळे दुसऱ्या भावाला जो तोटा झाला त्याच्या दुप्पट वा जास्त फायदा पहिल्या भावाला झाला तर त्याग परवडतो. एरवी परवडत नाही. ' परवडणे ' याचा उत्क्रांतिवादाच्या संदर्भात अर्थ हा की, ती जीन टिकून राहणे. जितके नाते दूरचे, तितक्या सामायिक जीन्स कमी. चुलत भावांमधे फक्त १२.५ टक्के जीन्स सामाइक असतात. तेव्हा चुलत भावासाठी त्याग करणे केव्हा परवडेल ? पडलेल्या किमतीच्या आठपट वा अधिक फायदा चुलत भावाला मिळणार असेल तर. दोन सख्ख्या भावांचा जीव वाचणार असेल तर स्वतःचा जीव देणे परवडेल, पण दोन चुलत भावांसाठी हौतात्म्य परवडत नाही. आठ किंवा जास्त चुलत भावांचे जीव वाचणार असतील तर आपला जीव देणे परवडेल. तात्पर्य, त्यागवृत्ती ही नाते- वाइकांच्या संदर्भात असेल आणि इतक्या हिशेबीपणाने केलेली असेल तरच उत्क्रांतीच्या रेट्यात शिल्लक राहील.

 आता प्रश्न असा की, हे सगळे हिशोब प्राणी कसा करतो ? समोर आपला भाऊ आहे की चुलत भाऊ हे त्याला कसे कळते ? माणसातसुद्धा नात्याचे बारकावे

७४ / नरांचा नारायण