पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/१०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

म्हणजे अपेक्षा. गर्भादान आणि पिल्लांचे पालनपोषण करणारे सर्व नर माणसाच्या मादीला सारखे वाटत नाहीत. डॉक्टर, इंजीनिअर, आय. ए. एस्., लाखोपती नर हा जास्त आकर्षक वाटतो. त्याच्यासाठी माद्यांमधे स्पर्धा होते. अर्थात अशीच परिस्थिती असलेल्या प्रत्येक समाजामधे हुंडा पद्धत आहे का ? नाही. तेव्हा हे विश्लेषण पुरेसे आहे असे म्हणता येणार नाही.
 पण सामान्यपणे " वरच्या",श्रीमंत वर्गामधे हुंडापद्धत, तर "खालच्या ", गरीब वर्गामधे देज पद्धत असावी असा तर्क करता येईल. एका बड्या लग्नामधे हुंडा म्हणून मुंबई बेटाची मालकी पोर्तुगालच्या राजघराण्याकडून इंग्लंडच्या राजघराण्या- कडे आली, हे आपण इतिहासात वाचलेलेच असेल.
 स्त्री आणि पुरुष यांच्या संबंधांबाबतच्या रूढी वेगवेगळ्या समाजात थोड्याफार वेगवेगळ्या असतील, पण स्त्री आणि तिचे अपत्य यांचे नाते मात्र स्थल - काल मर्यादा न मानणारे आहे. वात्सल्य, कारुण्य आणि त्याग ही मातृत्वाची लक्षणे सगळीकडे वंदनीय मानली गेली आहेत. क्षणभर पत्नी असली, तरी स्त्री ही अनंत काळची माता आहे. कुपुत्रः जायते कचित् अपि कुमाता न भवती, अशी आपली श्रद्धा आहे. कधीमधी या श्रद्धेशी विसंवादी सूर कानावर येतो. बिरबलाच्या दंतकथेतील हौदात सोडलेली माकडीण पाणी नाकातोंडात जाऊ लागल्यावर पिल्लाला बुडवून त्याच्यावर उभी राहते. पण ही फार कृत्रिम परिस्थिती झाली. निसर्गामधे पिल्लाला वाचवण्यासाठी प्राणपणाने लढा देणाऱ्या मादीची उदाहरणे सर्वांना ठाऊक असतात. निघडया छातीचा शिकारीसुद्धा वाघाच्या बच्च्याला हात लावायला घाबरतो. कारण वाघीण नेहमीचे स्वतःच्या सुरक्षिततेचे हिशोब विसरून बेभानपणे बच्चाला वाचवण्यासाठी हल्ला करेल असा त्याचा कयास असतो. हौतात्म्य, हा त्याग निसर्गामधे का बरे टिकतो ? उत्क्रांतिवादातून याचा अन्वय कसा लावायचा ? सोपे आहे. जी मादी पिल्लांकरता खस्ता खाईल, प्राणपणाने झुंजेल तिचा वंश वाढेल. जी मादी संकटाच्या वेळी पिल्लाला सोडून पळेल, तिचा वंश खुंटेल, म्हणून शेवटी अशी वागणूक शिल्लक उरणार नाही.

 पण निसर्गात त्याग करणे (आइझम) हा फक्त आईचा मक्ता आहे का ? आणि त्याग म्हणजे तरी काय ? स्वतःच्या ऐषआरामाची, सुखाची किंवा वेळी जीवाची पर्वा

७२ / नराचा नारायण