पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/१०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

दोन उदाहरणे मी थोडी जवळून पाहिली आहेत. ( इंग्रजीत या दोन प्रकारच्या हुंडयासाठी डावरी आणि ब्राइडप्राइस असे शब्द प्रचलित आहेत. मराठीत ब्राइड- प्राइसला दहेज किंवा देज असे शब्द वापरले जातात. )
गोंड ही भारतातील सर्वात मोठी आदिवासी जमात आहे. त्यांची लोकसंख्या तीस लाखाच्या आसपास आहे. यांची वस्ती मुख्यतः मध्य भारतात आहे. महाराष्ट्रात चंद्र- पूर-गढचिरोली या भागात गोंडवस्ती आहे. अबूझमाडिया ही गोंड समाजातील एक पोटजमात. चंद्रपूर आणि बस्तर या जिल्ह्यांच्या सीमेवरील १५०० चौरस मैल डोंगराळ मुलखात १५००० अबूझमाडिया राहतात. इतर गोंडांप्रमाणे यांच्यातही लग्नात नवरदेव सासऱ्याला हुंडा देतो. ज्यांना हुंडा देणे शक्य नसते ते नवरदेव काय करतात ? सासन्याकडे फुकट चाकरी करून, न घेतलेल्या पगाराच्या रूपाने हुंडयाची भरपाई करतात. अशी चाकरी करणाऱ्या तरुणाला लम्हाडा म्हणतात. अशी चाल इतरही आदिवासी जमातींमधे आहे. माझ्या पाहण्यात आलेल्या गावात असा एक लम्हाडा होता. त्यांचे दुःख येवढेच होते की, ज्या मुलीसाठी तो मर मर राबत होता तिचे इतर तरुणांशी संबंध होते. त्याने गावपंचायतीकडे तक्रार केली. रुजवात झाली. मुलीने कबुली दिली. पण ती म्हणाली की, या सगळ्या खेळात हा तरुणही सामील होता. पंच म्हणाले की, मग त्या तरुणीला खास दोष देण्यात अर्थ नाही. लम्हाडा आपल्या चाकरीच्या काळात सवलत मागत होता ती काही त्याला मिळाली नाही.
 गवळी धनगर ही सह्याद्रीच्या माथ्यावर राहणारी जमात सुमारे लाखभर बस्ती. गुरे चारून दूध विकून गुजराण करणारी ही माणसे. यांच्यातही बायको मिळवण्या- करता नवरदेव सासऱ्याला पैसे देतो. हा हुंडा किंवा देज शंभर रुपयांपासून हजार रुपयांपर्यंत असतो. या जमातीतल्या अनेक कार्या मंडळींना ही चाल नकोशी वाटते. मुलगी विकणे बरोबर नाही. हुंडा देण्यासाठी बरेचदा नवरदेव कर्जबाजारी होतो. हे टाळले पाहिजे असे अनेकजण म्हणतात. ही चाल बदलण्यासाठी अनेक वर्षे गवळी धनगरांच्या सार्वजनिक सभा होत असतात. अर्थात प्रगती फार मंदगतीने आहे.

 बायको मिळवण्यासाठी पुरुषाने हुंडा देण्याची ही पद्धत काही हिंदूजमातीमधे पलटली कशी? आढ्याचे पाणी वळचणीला गेले कसे? याला दोन कारण असण्याची . शक्यता आहे. एक म्हणजे एकपत्नी पद्धत. यातून पुरुषांमधली स्पर्धा घटली. दुसरे

तुझ्यावाचून करमेना / ७१