पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/१०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मुलखात घरटी करतात. तर्क असा की,मादीला वाटणाऱ्या आकर्षणामुळे नराची शेपूट एवढी लांब झाली असावी. अँडरसनने काही नरांची शेपूट निम्मी कापून टाकली. तरी त्याचे उडणे, मारामारी करणे कशातही फरक पडला नाही. म्हणजे जगण्यासाठी लांब शेपूट आवश्यक नव्हती. पण विणीच्या हंगामाच्या अखेरीला त्याला दिसून आले की, शेपूट तुटक्या पक्ष्यांच्या मुलखामघे बरीच कमी घरटी होती. त्यांच्यात अंडीही कमीच होती. याचा अर्थ असा की, शेपूट तुटक्या नरांची वंशवृद्धी लांब शेपटीच्या नरांपेक्षा कमी होत असणार आणि माद्या लांब शेपूट पाहून भुलत असणार.
 घुंगुरांवरच्या काही प्रयोगातून असे दिसून आले आहे की, माद्या स्वयंवराच्या वेळी एक प्रकारचा नाच करतात. नरांनी त्या नाचाला साथ द्यायची असते. जे नर तितक्याच वेगाने, कौशल्याने नाचू शकत नाहीत, त्यांना माद्या थारा देत नाहीत. अशा तन्हेने अशक्त, बावळट नरांचा वंश संपतो.

 माणसामधे काय परिस्थिती आहे ? अनेक समाजात एक नर, एक मादी असाच संबंध असतो. बहुपत्नीकत्व फार थोड्या प्रमाणात दिसते. मुस्लिम धर्मात चार बायका करायची परवानगी आहे. पण मोठा जनाना असतो तो फक्त बड्या, श्रीमंत मंडळीं- कडेच. सामान्य, गरीब स्तरात अनेक बायका असणारे पुरुष अपवादानेच दिसतात. स्वातंत्र्योत्तर काळात भारतामधे हिंदू समाजाने एकपत्नी पद्धत कायद्याने बंधनकारक म्हणून स्वीकारली आहे. पण तत्पूर्वीसुद्धां बहुपत्नीकत्वं तुरळक प्रमाणातच असावे. जगभर बहुतेक समाजात " माइल्ड पॉलिजिनी " किंवा तुरळक प्रमाणात बहुपत्नीकत्व दिसते. आदिम संस्कृतीमधे नरांमधील स्पर्धा विविध स्वरूपात दिसते. मोठी शिकार करणे, पौरुष सिद्ध करणारे शौर्याचे, धैर्याचे कोणते तरी काम करणे हा बायको मिळवण्याचा एक मार्ग असतो. दुसरा मार्ग म्हणजे तिच्याकरता आपल्या भावी सासन्याला हुंडा देऊ करणे. हा हुंडा गायी, बकऱ्या, रेनडिअर वगैरे पाळीव प्राण्यांच्या स्वरूपात असू शकतो. माहेरून पुरेसा हुंडा आणला नाही, म्हणून सुनेचा खून होण्यापर्यंत आज आपल्या समाजात प्रकरणे घडतात. त्यामुळे आधी बायको मिळवण्यासाठी हुंडा द्यावा लागत असे ही कल्पनासुद्धा अनेकांना अतिशयोक्त वाटेल. पण आजही नवऱ्याने हुंडा देण्याची पद्धत. आपल्या आसपास शिल्लक आहे. अशी

७० / नराचा नारायण