पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/१००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मुक्त असतात. शिवाय पाण्यति नराला जास्त अडचण असते, शुक्रजंतू हलके असतात. ते प्रवाहाबरोबर सहज वाहून जाऊ शकतात. नराने आधी शुक्रजंतू पाण्यात सोडले आणि मादीची अंडी तिथे आलीच नाहीत तर नराचे कष्ट अक्षरशः पाण्यात, त्यामानाने अंडी जड असतात आणि सहजी वाहून जात नाहीत. तेव्हा अंडी पाण्यात आहेत अशी खात्री करून मग त्यावर शुक्रजंतू सोडणारा नर जास्त पिल्लांचा बाप होईल. त्याच्या जीन्स पसरतील. तेव्हा या परिस्थितीत मादीला पळून जायला अवधी मिळेल. आता नराला पळून जाणे अवघड आहे. तोही पळाला, तर नक्कीच पिल्लांचे दिवस भरले. म्हणून नराने पिल्लांची काळजी घेतल्याची उदाहरणे जलचरां- मधे सापडतील. सुइणगिरी करणारा नर बेडूक तर मादीची अंडी, त्यातून पिल्ले बाहेर पडेपर्यंत आपल्या पाठीवर वागवतो.
 समजा, नराच्या आधी पळून जाता येत नाही, नराला कामालाही जुंपता येत नाही. मग नराकडून निदान गुणवान, वंशवृद्धीला योग्य असे पिल्लू होण्याची हमी तरी मिळवावी. हरणांच्या, माकडांच्या माया शक्तिवान, शूर, दीर्घायुषी नराबरोबर समागम करतात. त्यांना दुसरा पर्यायही नसतो म्हणा. इतर स्पर्धकांना हे नर पिटून काढतात आणि तरीही माद्या दुसरीकडे जाऊ लागल्या, तर त्यांनाही पिटून काढतात. पण जेव्हा पर्याय असतो, तेव्हा माद्या कोणत्या प्रकारच्या नराकडे ओढल्या जातात हे बघण्यासारखे असते. पक्ष्यांमध्ये नर आणि मादी यांच्यात फरक असतो, तेव्हा बव्हंशी रंग, आकार वगैरेबाबत नरामधे जास्त आकर्षक आविष्कार दिसतात. माद्या तुलनेने साध्या असतात. आकर्षक पिसारा मोराला असतो, लांडोरीला नव्हे; डौलदार तुरा आणि शेपूट कोंबड्याला असते. एखाद्या गुणधर्माचे माद्यांना आकर्षण वाटले, तर प्रत्येक पिढीमधे त्या गुणधर्माचा अधिकाधिक प्रसार होतो. कारण ज्या नराजवळ तो गुण पुरेसा नाही, त्याच्या वाटयाला मादीच येत नाही. त्याची वंशवाढ खुंटते. रति- मदनाच्या या खेळाची दोन प्रायोगिक उदाहरणे आता पाहू.

 माल्ट अँडरसन या स्वीडिश शास्त्रज्ञाने आफ्रिकेतल्या विडोबर्ड या पक्षाचा अभ्यास केला. कोकिळएवढा हा काळा पक्षी गवताळ प्रदेशात राहतो. यातल्या नराला खास फूट, दीड फूट लांब शेपूट असते. हे नर आपापली गल्ली राखून असतात. म्हणजे यांच्या मुलखात दुसरा नर घुसला तर लढाई होते. माद्या त्यांच्या पसंतीच्या नराच्या

तुझ्यावाचून करमेना / ६९