पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

संस्कृतीच्या माध्यमातून पुढल्या पिढीत ते नेण्याचा मार्ग मानवाच्या भवितव्याविषयी ग्वाही देऊ शकेल. नैसर्गिक सिलेक्शनपेक्षाही हे जास्त प्रभावी सिलेक्शन आहे. रशियन नेते आणि डुबिनिनसारखे शास्त्रज्ञ यांनी डार्विनप्रणित उत्क्रांती माणसाला लागू नाही असे उघड उघड सांगून सामाजिक वातावरण नि प्रशिक्षण यांना जे महत्त्व दिले आहे त्याचे पण कारण हेच. शिक्षणात बदल करणे म्हणजे केवळ कॉम्प्युटरचा वापर नव्हे किंवा पाश्चात्य पाठ्यपुस्तके वापरणे नव्हे. शिक्षणाचा खराखुरा गाभा जीनोटाईप- संस्कृतीच्या क्रिया प्रक्रियांतून निर्माण होतो. हा शिक्षणाचा मूळ सिद्धांत कृतीत आणता आला तर आपल्या देशात आपण एकात्मता निर्माण करूच पण त्याहीपुढे जाऊन पृथ्वीच्या भवितव्याविषयीपण ग्वाही निर्माण करू शकू. महात्मा गांधी हेच म्हणत असत, फक्त त्यांच्या म्हणण्याला मी वैज्ञानिक स्वरूप दिले आहे. 'नराचा नारायण ' होण्याच्या प्रयत्नास यश मिळण्यास हा एकच मार्ग आपणापुढे दिसतो.

पां. वा. सुखात्मे

दहा