पान:देशी हुन्नर.pdf/69

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ ६३ ]

लाख मातींत कालवून तिचे चुडे करून त्यांजवर रंगारंगाची शुद्ध लाख चढवितात.

 दिल्लीस लाखेचे चुडे करून त्यांजवर टिकल्या व बेगड लावितात. कांहीं चुडयांवर पहिल्यानें बेगड लावून त्यांजवर पाण्यांत कालविलेल्या रंगाने नक्षी काढून मग रोगण चढवितात. चुडे बहुतकरून बायकाच करितात.

 रेवा व इंदूर या गावीही लाखेचे चुडे होतात.

शिंपांचे दागिने.

 शंख कापून त्याच्या बांगड्या करून त्यांजवर लाखेची व सोनेरी वर्खाची नक्षी करून बंगाल्यांतील सर्व जातींच्या बायका पूर्वी घालीत असत. अलीकडे सुधारणेच्या प्रकाशामुळें कलकत्याकडे ही चाल बंद पडलो आहे; परंतु खेड्यांपाड्यांतून पुष्कळ बायकांच्याहातांत ह्या बांगड्या दृष्टीस पडतात. असल्या बांगडया हातांत घालाव्या असें शास्त्र आहे. अशी बंगालच्या लोकांची समजूत होती. अजूनही लग्नाच्या वेळीं मुलीचा बाप तिला शंखाच्या बांगड्यांचा आहेर करतो. डाका शहरीं मडमाच्या उपयोगी पडण्या सारख्या शंखाच्या बांगड्या अलीकडे तयार होऊ लागल्या आहेत. सिलहेट या गांवींही ह्या बांगड्या आयत्या विकत मिळतात. बंगाल्यांतील पूर्वेकडील प्रांतांत अजूनही सर्व जातीच्या हिंदू सवाशिणी शंखाच्या बांगड्या घालितात.

हस्तिदंताचे, शिंगाचे व लाकडाचे दागिने.

 हस्तिदंताचे मोठमोठाले चुडे अमदाबाद, सुरत, खेडा, मूर्शिदाबाद, कटक, अमृतसर, सियालकोट, मुलतान, पाली व इंदोर याठिकाणीं होतात. घड्याळाचे छेडे ख्रिस्त्यांच्या गळ्यांतील खुरूस, इत्यादि जिनसाही ठिकठिकाणीं होतात. बंगाल्यांतील सारणगांवाहन कलकत्त्याच्या प्रदर्शनांत हस्तिदंती बांगड्या आल्या होत्या. टिप्पेरा नांवाच्या बंगाल प्रांतांतील ईशान्येकडील जंगलांतील एकाप्रकारचे रानटी लोक कानफाट्या लोकांप्रमाणें कानांत हस्तिदंताचें वळें घालितात.

 हस्तिदंती बांगड्यांबद्दल मेहेरबान किपलिंग साहेबानें खाली लिहिलेला मजकूर प्रसिद्ध केला आहे:--