पान:देशी हुन्नर.pdf/68

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ ६२ ]

गांवीही बांगड्या व चुडे तयार होतात. बंगाल्यांत हजीपूर, पाटणा, भागलपूर, आणि मुर्शिदाबाद येथेंही बांगड्या व चुडे तयार होतात. शिवापूर येथें लिंगाईत कासारी लोक बांगड्या तयार करीत असतात. हे लोक पूर्वी हैदराबादेहून कांच आणीत असत परंतु अलीकडे "कांच बांगडीवाले" लोक चुरमुरे डाळें घेऊन सर्व गांवभर फिरतात. व त्याच्यावर कांच मिळवितात. ठाणें जिल्ह्यांत चिंचणी येथें रंगी बेरंगी कांचेचे फारच चांगले चुडे तयार होतात. शिवापूरच्या बांगड्या अगदींच हलक्या असतात. चिंचणीचे चुडे व गजरे पांढरे सफेद असून त्यांत रंगारंगाचे नागमोडी पट्टे असतात. सुमारें चोवीस वर्षामागें अल्लीभाई गुलाम मोहिदीन नावाच्या मनुष्यानें हे चुडे व गजरे करण्याची प्रथम सुरुवात केली. पुण्याच्या प्रदर्शनाकरितां हल्ली असले चुडे, गजरे, 'राणीचा बावटा' या नांवाच्या नवीन तऱ्हेच्या बिलोरी बांगड्या, टांक बसविण्याकरितां दांड्या [हान्डल्स ] व काठ्या आल्या आहेत. असल्या सामानास कलकत्ता प्रदर्शनांत सन १८८३ सालीं लायकीचें सर्टिफिकेट मिळालें होतें. परंतु त्या सामानापेक्षां हल्लींचें सामान फार चांगले आहे.

 'राणीचा बावटा' या नांवाच्या बांगड्या ह्या चिंचणीच्या बांगड्यावरून तयार होऊन विलायतेहून इकडे आल्या. त्याचा इतिहास असा आहे कीं, सन १८८३ सालीं कलकत्ता येथील प्रदर्शनांत चिंचणीचे चुडे व गजरे गेले होते. ते पाहून विलायतेच्या एका साहेबानें ते सर्व आमच्याजवळ विकत मागितले. असला माल एकदम एकाच व्यापाऱ्यास देणें आम्हांस पसंत पडलें नाहीं त्यामुळें साहेब महशूर निराश होऊन त्यांनी तसलेच दुसरें पुष्कळ सामान आह्मांस सांगून चिंचणी येथून पत्र लिहून आणविलें. पुढें लंडन शहरी या साहेबांची व आमची गांठ पडली तेव्हां त्यांनी तोच माल पुन्हा मागितला. ही गोष्ट झाल्यानंतर थोड्याच महिन्यांनी जुबिली आली त्या वेळीं हा 'राणीचा बावटा ' झळकला. या गोष्टीवरून प्रदर्शनांतील माल नुसता पाहून सुख न मानतां त्याजपासून व्यापार धंद्यास कांहीं तरी फायदा होईल असले उद्योग करण्याचा कित्ता आपण गिरविला पाहिजे हा बोध होतो.

 खेडा जिल्ह्यांत कपडवंज येथे कांच तयार होते तिच्याही बांगड्या करितात.
 मद्रास इलाख्यांत व्यंकटगिरी या गांवी अशीच कांच तयार होते.

 असाम प्रांतीं सिलहेट जिल्ह्यांत करीमगंज गांवीं लाखेचे चुड़े तयार होतात.