पान:देशी हुन्नर.pdf/64

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ ५८ ]

 सन १८७२ सालीं मेहरबान पॉवेल साहेब यांनी पंजाबी हुन्नरावर एक पुस्तक लिहिलें आहे, त्यांत बनारस येथें मिन्याचे काम होतें असे तें लिहितात; परंतु सन १८८० सालापासून आह्मी १३ प्रदर्शनांचे काम केलें, त्यांत कोठेही बनारस येथून या कामाचे नमुने आलेले पहाण्यांत आले नाहीत. बनारस येथे मिन्याचे काम करविल्यास होईल असे कित्येकांचे ह्मणणे आहे.

 पंजाबांत, दिल्ली, कांग्रा, मुलतान, भावलपूर, जंग आणि हजारा या गांवीं मिन्याचें काम होतें. परंतु त्या सर्वात दिल्लीचेंच काम नांवाजण्यासारखे आहे. जयपुरांतील कामांप्रमाणेच याही कामास परदेशस्थ गिऱ्हाइकेंच जास्त मुलतान, जंग आणि कांग्रा या गांवचा मिना बहुतकरून पिरोज रंगाचा असतो या कामासंबंधाने किलिंगसाहेबांचे असें ह्मणणे आहे कीं, "तांबडा व पांढरा रंग फारसा कोठें आढळत नाहीं; व या रंगाच्या आंगी पारदर्शकत्व नाहीं. मिनां चढवितांना घडीव काम करून त्यावर मिना चढवितात. परंतु हें घडीव काम छिनीनें ठोकून केलेलें नसतें. ठशावर (थप्पा) सोन्याचा किंवा चांदीना पत्रा ठेवून त्याजवर ठोका मारून नक्षी वाढवितात. भावलपुरास मिन्याचे ठळक ठळक दागिने होतात. तेथील एकदोन रंगाचा मिना मात्र पारदर्शक असतो. हजारा या गांवी हिरवा व पिंवळा या दोनच रंगाचा मिना तयार होतो, व तोही हलक्या प्रतीचा असतो."

 दंतकथा अशी आहे कीं, चारशें वर्षांपूर्वी नौलू नावाच्या एका मनुष्यानें प्रथम हा हुन्नर मुलतानांत आणला, त्यांत झालेली सुधारणा मागाहून आस्ते आस्ते झालेली आहे. नौलू हें नौरोजी या पारशी नांवाचें मूळ स्वरूप आहे, व मिन्याचें काम इराणांत चांगलें होते, या दोन गोष्टींचा विचार केला ह्मणजे हा हुन्नर इराणांतून आमच्या देशांत आला असावा असें अनुमान होतें.

 कांग्रा येथील सोनारलोक बारीक सारीक दागिन्यांवर मिन्याचें काम बरें करतात. हातांतील आंगठ्या, जोडवीं, तायत्या, पेट्या, डुल असल्या जिनसा तेथें विशेष होतात. त्यांच्या नक्षींत कधीं कधीं चित्रविचित्र पुतळे असतात. हे जरी वेडेवांकडे दिसतात तरी त्यास विद्रूप ह्मणतां येत नाहीं. महिरापीची एक रांग काढून तिच्यांत लहान लहान पाखरें बसवून त्यांची एक माळच्या माळ करून दाखविण्याची कांग्रा येथें सर्व साधारण चाल आहे.