पान:देशी हुन्नर.pdf/63

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ ५७ ]

नांवाच्या शहराजवळ भगोरिया गांवीं कोबोल्ट या धातूचें भस्म सांपडते, त्याचा निळा रंग होतो. सोन्याच्या भांड्यावर सर्व जातीचे रंग उठवितां येतात. चांदीवर काळा, हिरवा, निळा, पेवडी, नारंगी, किरमिजी व विटकोरी इतके रंग उठवितां येतात. तांब्याच्या भांड्यावर पांढरा, काळा, गुलाबी हे रंग वठतात. त्यांतही गुलाबी रंग वठवतांना जयपूर येथें बरेच वेळां भट्टी बिघडते. कोणकोणत्या रंगास जास्त आंच द्यावी लागते हें कळण्याकरितां त्यांचे नंबर लाविले आहेत तेः--पांढरा, निळा, हिरवा, काळा व तांबडा. लालडीचा उत्तम तांबडा रंग सर्वच कारागिरांस साधत नाहीं. हा वठविणारे लोक जयपुरास सुद्धा फारच थोडे आहेत. सन १८५१ सालच्या युरोप खंडांतील पहिल्या प्रदर्शनांत बक्षिसें देण्यास नेमलेल्या परीक्षकांस या तांबड्या रंगाच्या अंगीं असलेल्या पारदर्शकत्वानें अगदीं चकित करून सोडलें होते. अलवार येथील मिनाकार जयपुराहूनच तेथें गेले आहेत. ते तांबडा रंग वठवितात हें नवल नाही. परंतु दिल्ली शहर-कीं जेथें लाखों रुपयांचे मिन्याचे दागिने नेहमीं तयार होतात -तेथल्या देखील मिनागार लोकांची मजल जेमतेम नारिंगी रंगापर्यंत येऊन पोहोंचते पुढें जात नाहीं."

 जयपुरास तायत्या, पेट्या, कांकणें, वाळे, बांगडया, गळसऱ्या, पदकें इत्यादि पुष्कळ दागिने मिन्याचे होतात. उत्तम प्रकारचें मिन्याचें काम स्वदेशी दागिन्यांवर त्यांच्या पाठीमागच्या बाजूला किंवा कडेवर अजूबाजूला होत असतें; कारण त्यांच्या दर्शनीं बाजूस हिरे माणकें जडविलेलीं असतात. जयपुरास कइरीच्या आकाराची सोन्याची मिना चढविलेली डबी तयार होते, ती साहब लोकांस फार आवडते; तिचा उपयोग उत्तर हिंदुस्थानांत अत्तराचा फाया ठेवण्याकडे करितात.

 युरोपियन लोकांकरितां केलेल्या कंकणांवर दोनही बाजूंस मिन्याचें काम करावे लागतें. मिना चढविलेली पदकें दुहेरी सांखळ्यांनीं गुंतवून त्यांच्या माळा करतात, त्यांस इंग्रजीत 'नेकलेस' ह्मणतात. हीं पदकें बहुतकरून रूपयासारखीं वाटोळी असतात व त्यांच्या दोनही बाजूस मिन्याचें काम असतें. असलें काम प्रतापगड व रतलाम या गांवी होतें. सोन्याचे किंवा रुप्याचे घुंगुर करून त्यावर मिन्याचें काम करतात, व तें सांखळ्यांत गोंवून त्यांच्या माळा व घड्याळांचे छेडे करतात.