पान:देशी हुन्नर.pdf/65

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ ५९ ]

युरोपखंडांत तयार झालेला कोणचाही दागिना तेथील सोनारांपुढे ठेविला असतां ते त्याची हुबेहूब नकल करतात अशी त्यांची कीर्ति आहे.

 विकानेर येथेंही काही मिन्याचे काम होतें, पण तें डोकीचे दागिने, तलवारीच्या मुठी, असलेंच काम होतें. एक तोळा चांदीवर मिना चढविण्यास दोन रुपये मजुरी पडते. अलवारचें काम विकानेरपेक्षा कांहीं बरें असतें.

 आसाम प्रांतीं जोरहात येथेंही मिन्याचें काम होतें. त्यांत निळा, हिरवा व पांढरा हे तीन रंग आढळतात. मडमांच्या गळ्यांतील पेट्या, डूल, कांकणे व माळा ह्याही तिकडे होऊं लागल्या आहेत.

 इंदोर व रतलाम येथें एका प्रकारचा खोटा मिना होऊं लागला आहे. हें काम कोणत्या प्रकारानें करितात हें अजूनपर्यंत बाहेर फुटलें नाही. परंतु असें ह्मणतात की, सोन्याचा पातळ पत्रा घेऊन त्याची फुलें कातरतात व तीं कांचेवर बसवितात. त्यामुळे ती दुसऱ्या बाजूने पाहिलीं असतां मिन्यासारखी दिसतात. ह्या मिन्याच्या कामांत कधीं कधीं सोन्याच्या किंवा चांदीच्या बारीक तारेची नक्षी बसवून देतात. त्यामुळें त्यास विशेष शोभा येते. [ मिन्याबद्दल आणखी माहिती मिन्याची भांडी या सदराखाली येईल. ]

हलक्या धातूचे दागिने.

 हलक्या धातूचे ह्मणजे पितळेचे, कथलाचे, काशाचे वगैरे दागिने सर्व देशभर होतात. त्यांत बंगाल्यांत व वायव्येकडील प्रांतांत जास्ती होतात. हे दागिने बहुधा गळ्यांत, हातांत किंवा पायांत घालण्याचे असतात. त्यांत हसळी, वाळे, कडी, पाटल्या, वाक्या, तायत्या, गोठ, तसेंच पायरी ह्मणून एक पायांत घालायाचा जड दागिना व बतेसी या नांवाच्या मणगटापासून कोपरापर्यंत घालावयाच्या बांगड्या व खारू नांवाचे चपटे चुडे हे मुख्य आहेत. गुजराथेंत खेडाजिल्ह्यांत पितळेचे भले जाड लंगर करितात.
 मद्रास इलाख्यांत मद्रास, मदूरा, आणि कृष्णा येथें हलक्या जातीचे दागिने होतात. हे बहुतकरून तांब्याचे असतात. मानव जातिविशिष्ट शास्त्रीय ज्ञानाचा अभ्यास करणारास ह्या दागिन्याचा पुष्कळ उपयोग आहे. कौशल्य शास्त्राचा अभ्यास करणारासही हे दागिने पुढें ठेवून त्यांतील नक्षीच्या नमुन्यावर नवीन वेलबुट्टी काढण्यासही उपयोग होतो,