पान:देशी हुन्नर.pdf/59

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ ५३ ]

च्याच घरीं गेलें पाहिजे. हल्लीं आमच्या देशांत असलें काम स्वप्नांतही दृष्टीस पडण्याची पंचाईत होऊं लागली आहे. हुक्कयाच्या तोट्या, तलवारीच्या, जंबियाच्या, काठ्यांच्या व कुबडीच्या मुठी या सर्व जिनसा विलायतेंत दृष्टीस पडतात. असल्या कामास लाविलेलीं रत्नें लहान लहान असल्यामुळें तीं फारशीं मौल्यवान नसतात. तत्रापि पच्चीकाराच्या कौशल्यामुळें तीं अकीकांत बसविलीं ह्मणजे फार सुरेख दिसतात. पूर्वी पच्चीकार लोकांस राजे लोकांच्या कपड्यावर रत्नें बसविण्याचें काम मिळत असे. श्रीमंत खंडेराव महाराज गाइकवाड यांनी सुमारे २० वर्षांपूर्वी तयार करविलेली चादरही असल्या मौल्यवान कामाची अखेरची झुळुक समजली पाहिजे. ..जसा दिव्याचा प्रकाश मोठा होऊन तो विझतो त्याप्रमाणे या रत्नखचित चादऱ्येच्या रूपानें आमच्या देशांतील पच्चीकारांचा लोप झाला. कापडावर कान करितांना अकीकांत बसवितात त्याचप्रमाणे सोन्याच्या पत्र्याचीं कोंदणें करून त्यांत ते बसवितात.

 आंगठीत बसवितांना रत्नें खुलीं ठेवण्याची चाल युरोपियन लोकांपासून आम्ही घेतली आहे असें किपलिंग साहेबांचें मत आहे. हलक्या हिऱ्याच्या मागें बेगड बसविणें किंवा फुटलेला हिरा सारखा कांतून बेमालूम बसविणें हीं कामें आमच्या लोकांस अजून साधलीं नाहींत. मुंबई व कलकत्ता या शहरीं दिल्लीचे पच्चीकार येऊन राहिले आहेत. बंगाल्याकडे रत्नजडित काम फार थोडें होते, त्याचीं कारणें दोन आहेत. एक खरे राजघराण्यांतील पुरुष तिकडे नाहींत, आहेत ते पदव्या धारण करणारे आहेत. व दुसरें इंग्रजी विद्येच्या प्रभावामुळें श्रीमंत लोकांस दागिन्याची फारशी आवड राहिली नाही. अकीक, लाल व स्फटिक यांच्या माळा, आंगठ्या, लोलक इत्यादि जिनसा तयार होतात; त्यांचे वर्णन “ मणीकारांचे काम " ह्या सदराखाली पुढें दिलें आहे.

साहेब लोकांकरितां तयार होत असलेले देशी दागिने.

 हल्लीं युरोपियन लोकांची भक्ति आसाम व ब्रम्ह देशांतील दागिन्यांवर बसत चालली आहे. हिंदुस्थानांत डाका, कटक, लखनौ, दिल्ली व त्रिचनापल्ली या शहरीं युरोपियन लोकांचे दागिने तयार होत असतात. हे बहुतकरून चांदीचे असतात. त्यांचा आकार युरोपियन तऱ्हेचा असून त्याजवरील नक्षीकाम देशी धर्तीवर असतें. कटक येथील काम चांदीच्या तारेचेंच असतें. सोळा भार शुद्ध