पान:देशी हुन्नर.pdf/56

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ ५० ]

 मेखला--सोन्याची आठ पदरी सांखळी.
 रसना--षोडश पदरी कटिवेष्टन.
 कलाप--पंचवीस पदरी कटिवेष्टण.
 कांचिदाम--चार बोटे रुंदीचा गोंडे व गुंग्रु असलेला सोन्याचा पट्टा.

पायांची भूषणें

 पादचूड--रत्नजडित सुवर्णाचा वाळा.

 पादकंटक--चौकोनी तीन शिरांचा सोनेरी वाळा. यांत ध्वनि निघावा ह्मणून दाणे असतात.

 पादपद्म--तीन किंवा पांच सोनेरी सांखळ्यांचा जडावाचा दागिना. बंगाल्यांत चर्णचाप किंवा चर्णपद्म या नांवाचा एक चांदीचा दागिना हल्लींही प्रचारांत आहे.

 किंकिणी--सोन्याचें पैंजण.

 मुद्रिका-- हा दागिना सोन्याचा करून त्याजवर तांबडा रंग देत असत. हा ही घुंंगराप्रमाणें वाजत असे.

 नूपुर--ह्मणजे चाळ, परंतु प्राचीन काळचे चाळ सोन्याचे असत व ते सीतेसारख्या पुण्यशील स्त्रियाही वापरीत असत. हल्लींचे नुपुर पितळेचे असतात, व बहूतकरून कलावंतिणी वापरतात.

अर्वाचीन दागिने

 हिंदुस्थानांत परदेशांतून येणारें किंवा येत असलेले बहुतेक सोनें किंवा रुपें दागिन्याच्याच कामांकडे खर्च होते. विलायतेप्रमाणें या देशांत सोन्याचे दागिने करणारे रुप्याचे दागिने करणाऱ्यांपासून वेगळे नसतात. हल्लीं ग्लास्गो येथें सुरू असलेल्या प्रदर्शनांत दोन दागिने घडणार पाठविले आहेत; त्यांत एक जातीचा कुणबी आहे व दुसरा जातीने कारकुनीचा धंदा करणारा आहे. तत्रापि तो जन्मापासून मुका व बहिरा असल्यामुळें त्याच्या आईबापानीं त्यास सोनाराच्या हाताखालीं ठेवून हाच धंदा शिकविला आहे. पाश्चिमात्य सुधारणेच्या योगानें आपल्या देशांत अनेक प्रकारचे फेरफार होत चालले आहेत, त्यांत सोनारा सारख्या आणखी पुष्कळ उत्तम कारागिरांचा पूर्वापार धंदा