पान:देशी हुन्नर.pdf/55

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ ४९ ]

रावे हें त्यास सुचेना. हस्तनापूरचा राजा आपल्या पक्षाकडे कसा मिळतो याचा विचार करीत एका विहिरीच्या बांदास टेंकून तो स्तब्ध बसला होता इतक्यांत तेथील राजपुत्र त्याच ठिकाणीं खेळण्या करितां आले. या मुलांचे आपल्याकडे लक्ष जावें ह्मणून द्रोणानें आपल्या हातांतील आंगठी पाण्यांत टाकिली, व ती 'इषिका' नामक विद्येच्या सामर्थ्यानें अलगत काढून घेतली. हा चमत्कार आपल्या घरीं जाऊन सांगण्याविषयीं द्रोणानें राजपुत्रांस सुचविलें. पुढें हस्तनापूरच्या राजाचा व द्रोणाचा परिचय होऊन द्रोणास राजपुत्रांच्या गुरूची जागा मिळाली. व अश्वत्थाम्यास खरोखरीचें दूधही पुष्कळ प्राप्त झाले. हस्तनापूरचे राजपुत्र मोठे झाल्यावर आपल्या गुरूचा अपमान केल्याबद्दल पांचाळ राजास त्यांनीं रणांगणीं योग्य शासन केलें.
 ही गोष्ट महाभारताच्या बंगाली देशांतील पाठांत आहे.
 रामायणांतील मुद्रिका मारुतीनें सीतेकडे नेली ही गोष्ट सर्वांस माहीत आहेच.
 संस्कृत पुस्तकांत खालीं लिहिलेल्या आंगठ्यांचे वर्णन सांपडतेः--
 द्विहिरक-दोन बाजूंस दोन हिरे व मध्यें पाचेचा खडा मिळून तीन खड्यांची आंगठी.
 वज्र--त्रिकोनारुति कोंदण त्यांत हिरा आणि तीन कानांवर तीन रत्नें.
 रविमंडळ--मध्यें इतर रत्नें व त्यांच्या भोवती हिरे, अशा प्रकारची आंगठी.
 नंद्यावर्त--चौकोनी कोंदणांत बसविलेली रत्नजडित आंगठी.
 नवरत्न किंवा नवग्रह--हिरा, माणिक, लस्न्या, मोत्यें, गोमेद, प्रवाळ, पाच, पुष्पराग, आणि इंद्रनील अशी नवरत्नजडित आंगठी.
 वज्रवेष्टक--कोंदणाभोवती हिरे असलेली आंगठी.
 त्रिहिरक--मध्यें मोठा हिरा व बाजूला दोन लहान अशी तीन हिऱ्यांची आंगठी.
 सुक्तिमुद्रिका--नागाच्या फणीच्या आकाराच्या कोंदणाची रत्न जडित आंगठी.
 मुद्रा अथवा अंगुली मुद्रा--कोंदणावर नांव कोरलेली मुद्रा.

कमरेचे दागिने

 कांची--सोन्याची एक पदरी सांखळी.