पान:देशी हुन्नर.pdf/52

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ ४६ ]

इत्यादि प्रकार बंगाल्यांत हल्लीं आढळतात, आपल्या प्रांतीही 'लवंगा' दि प्रकार आहेतच.

 कर्णिका--यास 'तालपत्र', 'ताडपत्र ' व 'तालवर ' इत्यादि नांवें होतीं. हें ताडाच्या पानाच्या आकाराचें होते. हल्लीं असला दागिना कोठें वापरण्यांत नाहीं. तत्रापि ताडपत्राच्या दागिन्यांवर लाखेची नक्षी करून कोठें कोठें ते कानांत घालतात.

 शृंखल--सोन्याची सांखळी. उत्तर हिंदुस्थानांतील कांहीं लोक व दक्षिणेंतील गवळी लोक असल्या सांखळ्या कानांत घालतात.

 कर्णेन्दु--ह्मणजे कानांतील चंद्र. हा दागिना कानाच्या मागल्या बाजूस घालीत असत.

 ललाटिका अथवा पत्रपाश्या--सुवर्णाचें लहानसें रत्नजडित तवकट 'पाशा' या नांवानें बंगाल्यांतील लोक थोड्या दिवसांपूर्वी कानांत घालीत असत.

गळ्यांतील दागिने.

 प्रालंबिका.--नाभीपर्यंत लोंबणारी एक माळा.
 उरस्सत्रिका--नाभीपर्यंत पोचणारी मोत्यांची माळा.
 देवच्छंद--शंभर सराचें मोत्याचें पेंडे.
 गुच्छ--बत्तीस पदराचें मोत्याचें पेंडे.
 गुच्छार्ध--चोवीस सराचें मोत्याचें पेंडे.
 गोस्तन--चारपदरी मोत्यांची कंठी.
 अर्धहार--बारा पदरी मोत्यांची कंठी.
 माणवक--वीस पदरी मोत्यांची कंठी.
 एकावली--एक पदरी मोत्यांची कंठी.

 नक्षत्रमाला--ह्मणजे नक्षत्राची माला. हीत एकच पदर असून सत्तावीस मोत्यें असतात.

 भ्रामर--मोठ्या मोत्यांची एकपदरी कंठी.

 नीललवनिका--पांच, सात, व नऊ पदरी मोत्यांची कंठी असून तिला पाचेचे लोलक लाविलेले असतात.