पान:देशी हुन्नर.pdf/26

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[ २० ]

कठीण. लंडनांतील सन १८८६ साली झालेल्या प्रदर्शनांत "हिंदुस्थानांतील राजवाडा" म्हणून एक लहानसें घर बांधलें होतें. तें काम करणारे सुतार भेरा या गांवचे होते, व हल्लींही त्याच गांवचे दोन असामी ग्लासगो येथील प्रदर्शनांत काम करीत आहेत. हे पंजाबी लोक देवदाराच्या लांकडावर काम करितात, व त्यांनी केलेली नक्षी एका चौकटींत आडव्या उभ्या चिपा बसवून केलेली जाळीदार अशी असते, त्यामुळें त्यांचें काम थोड्या किंमतींत मिळतें. मेहेरबान किपलिंग साहेब यांचे असें ह्मणणे आहे की, सिमला येथे असणाऱ्या युरोपियन लोकांसाठी काम करणाऱ्या कांहीं सुतारांखेरीज पंजाबांतील बहुतेक सर्व सुतार जाळीचंच काम जास्त करितात. घराच्या दरवाजांवर व खिडक्यांवर कधी कधी खोदीव काम दृष्टीस पडते; परंतु तें बहुतकरून परक्या गांवांहून तयार करून आणलेलें असतें. पंजाबांतील नक्षी मुसलमानी धरतीची आहे. तींत जाळ्या व पिंजरे हेच पुष्कळ असतात. दिल्ली, लाहोर, अमृतसर व बयला, या गांवांतील नव्या घरांपेक्षा जुन्या घरांच्या दरवाजावरील नक्षी चांगली आहे. तथापि त्या गांवीं हल्लींही खोदीव काम तयार होत असतेंं. पंजांबांतील सुतारांची मुलें लहानपणापासून हेंच काम करण्यास शिकतात. त्यामुळें कारागीर मिळण्याची हांकाहांक न पडतां कामही थोड्या पैशांत होतें. अलीकडे असल्या कामांस गिऱ्हाइकी जास्ती चालल्यामुळें भाव काही अंशी चढला आहे.”

 मुंबई इलाख्यांतील खोदीव कामाचा उत्तम नमुना बडोदे येथून लंडनप्रदर्शनांत गेला होता. तीन पुरुषांच्या वेंगेंत मावेल येवढा सुमारे ४० फूट उंचीचा जाड खांब खोदून त्याजवर देवळाप्रमाणें, देव्हाऱ्याप्रमाणें, किंवा मखराप्रमाणें खोदींव कामाचे लहान लहान मनोरे करून त्यांत खबुतरांस बसण्यास जागा केली होती. या खबुतरखान्याच्या चार बाजूंनी सुमारे १५ फूट उंचीचे तसेच नक्षीदार चार लहान खबुतर खाने लाविले होते. या प्रदर्शनांत काम करीत असतांना लंडन शहरीं छापून निघत असलेल्या "जर्नल आफ् इंडियन आर्ट " नांवाच्या चित्रयुक्त त्रैमासिक पुस्तकांत आम्ही कांहीं मजकूर छापविला होता, त्यांत असें म्हटलें होते कीं,-शिल्पकलेसंबंधीं लांकडावरील खोदींव कामाचा विचार करीत असतां निदान पश्चिमहिंदुस्थानाच्यासंबंधाने तरी हा धंदा गुजराथी लोकांचाच आहे अशी आमची खातरी होते. या जैन किंवा वैष्णव धर्माच्या गुजराथ्यांचे पूर्वज बौद्ध धर्मानुयायी होते, त्यावरून त्या धर्माच्या