पान:देशी हुन्नर.pdf/27

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[ २१ ]

लेण्यांत दृष्टीस पडत असलेलें दगडावरील खोदींव काम करणाऱ्या प्राचीन कारागिरांचे हे वंशज होत; तेव्हां या प्राचीन काळच्या काम करणारांनी उपयोगांत आणलेल्या, फोडण्यास कठीण अशा दगडांच्या बदला अर्वाचीन काळीं सहज खोदतां येणाऱ्या लांकडाचा उपयोग होऊं लागण्यास मुसलमान सत्ताधीश कारण झाले असावेत. सोन्याच्या तारेच्या बदला कलाबतूचें काम करणें, सोन्याच्या वर्षाच्या ठिकाणीं बेगडीचें काम करणें व स्फटिकाच्या ठिकाणीं कांचेचा उपयोग करून थोड्या किंमतींत विशेष भपका दाखविणे, ही तऱ्हा मुसलमानी आहे; त्यांतलाच हा एक प्रकार असावा. कलकत्ता येथील प्रदर्शनांत ठेवण्याकरितां सन १८८३ साली सर रिचर्ड टेंपल यांचे चिरंजीव क्यापटन् टेंपल यांनीं गायकवाडी राज्यांतील दभोई या गांवांत असलेल्या एका अतिप्राचीन मानलेल्या घराचा सज्जासुद्धां दरवाजा पाठविला होता. या सज्जावर मुसलमानी तऱ्हेचीं सुरूची झाडें खोदलेलीं होतीं. दभोई या गांवीं अजूनही खोदींव काम करणारे कुशल सुतार पुष्कळ आहेत, व गायकवाडीत वासु, सोजित्रा, पेटलाद, पट्टण, सिधपूर, बडनगर, आणि बडोदा, ह्या सर्व शहरीं लांकडावरील नकस काम जिकडे तिकडे दृष्टीस पडतें. अमदाबाद व सूरत हीं दोनही शहरें असल्या कामाबद्दल प्रसिद्ध असून गुजराथेंतच आहेत. पाश्विमात्य देशांशीं आमचें दळणवळण होऊं लागल्यापासून मुंबईत तयार होत असलेलें नक्षीदार ‘फरनिचर' खोदणारे लोक सुद्धां गुजराथीच आहेत. हल्लीं बडोदें येथे नवीन तयार होत असलेल्या राजवाड्यांत या गुजराथी सुतारांच्या हस्तकौशल्याची व कर्तबगारीची कमाल होऊन गेली आहे. मद्रास इलाख्यांतही घरें बांधण्याचे कामीं लांकडावर केलेल्या खोदींव कामाचा उपयोग करितात. सन १८८६ साली विलायतेस प्रदर्शन झाले, त्यांत मद्रासेहून एका घराच्या सज्जाचें काम तयार होऊन गेलें होतें. निंबाऱ्याच्या लांकडाचा एक कोरींव दरवाजाही मद्रास सरकारानें पाठविला होता.

 याचप्रमाणे नागपुरासही काम होतें. नागपूर शहरीं मराठे सरदारांची मोठेमोठालीं घरें आहेत, त्यांजवरील लांकडाचे कोरीव काम पाहण्यासारखें आहे. मध्यप्रांतांत कौशल्याचीं कामें फारच थोडीं होतात, तथापि तेथें नक्षीदार लांकडी कामाची शहरोशहरीं व गांवोगांवी मोठी रेलचेल आहे. सिकार, फत्तेपूर, लखमनगड, झुंझून, चिरावा, नवलगड, व सिंघाणा इत्यादि जयपूर संस्थानांतील गांवी लांकडाचें ठळक ठळक कोरींव काम पुष्कळ ठिकाणीं होते, "क-