पान:देशी हुन्नर.pdf/25

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[ १९ ]

भिंतींवर कांचेचे तुकडे चिकटवून मजेदार नक्षी केलेली आहे. म्हैसूर प्रांतावर मुसलमान लोकांची सत्ता होती त्या वेळी तेथील घरांवर "सांदल्याची" नक्षी करून तिजमध्यें अनेक तऱ्हेचे रंग भरण्याची व सोनेरी वर्ख चिकटविण्याची चाल असे. म्हैसूर येथील राजवाड्यांत असल्या तऱ्हेंचे काम अजून दृष्टीस पडते. पुणें, येवलें, बडोदें, व इतर कांहीं गांवीं भिंतीवर चित्रें काढून त्यांजवर रोगण चढविण्याची चाल अझून आहे. काहीं काहीं ठिकाणी चुना, अभ्रकाची पूड आणि अळशीचें तेल एकत्र घोटून त्यानें भिंती रंगविलेल्या दृष्टीस पडतात. हा रंग संगजिऱ्यासारखा दिसतो. परंतु तो आपल्या देशांत पूर्वीपासून लोक तयार करीत आले, किंवा अलीकडेसच तयार होऊं लागला याची खात्रीलायक माहिती नाहीं.

 लांकडावरील खोदीव कामाची नक्षी हिरव्या, तांबड्या, पिवळ्या किंवा निळ्या रंगांनी चित्रून टाकून आपल्या घरांस शोभा आणण्याची गुजराथी व मारवाडी लोकांत चाल आहे; परंतु अळशीच्या तेलाचा रंग पूर्वी आपल्या देशांत होत नसे, यामुळे ती चाल अर्वाचीन काळींच प्रचारांत आली असावी असें वाटतें. नेपाळदेशांत घरें रंगविण्याची चाल आहे; परंतु तिकडेसुद्धा विलायती रंगांची रेलचेल होऊन असलें सर्व काम बेताल होऊन गेलें आहे.

शिल्पकलेत लागणारें लांकडावरील खोदींव काम.

 बंगाल प्रांत खेरीज करून इतर सर्व प्रांतांत लांकडावरील खोदींव काम जिकडे तिकडे दृष्टीस पडतें. सुरतेस, अमदाबादेस, व अजमिरास असली खोदींव कामें केलेलीं घरें इतकी आहेत कीं, त्या शहरांतून चालतांना रस्त्याच्या दोन्ही बाजूंनीं खोदींव कामाशिवाय कांहींंच दिसत नाहीं. साहारणपूर, अल्लीगड, बडोदें, फिरक्काबाद, मैनपुंरी, लखनौ, कानपूर, मथुरा, आग्रा, भावनगर, सुरत, जुनागड, व कच्छ ह्या सर्व ठिकाणांहून लांकडाचे खोदींव नमुने लंदन येथील प्रदर्शनास सन १८८६ सालींं पाठविले होते. सुरत, बरेली, अजमगड व बुलनशहर या गांवीं घरें बांधण्यास उपयोगी पडणारें लांकडावरील खोदींव काम पुष्कळ तयार होतें. पंजाबांत, शहापूर जिल्ह्यांतील भेरा, गुरुदासपूर, बुलढाणा, अमृतसर, जंगजिल्ह्यांत चिनिअट, झेलम, रावळपिंडी, हिस्सार, लाहोर व सियालकोट ह्या सर्व गांवीं लांकडावरील खोदींव काम तयार होतें इतकेंच नाहीं, तर खोदींंव काम करणारे सुतार ज्यांत नाहीत असा गांव सुद्धा मिळणें