पान:देशी हुन्नर.pdf/24

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[ १८ ]

काम गवंडीलोक व चितारीलोक करितात. ह्या नक्षींत वेलबुट्टी असून कधीं कधीं प्राण्यांची चित्रें असतात. उत्तर व पश्चिम हिंदुस्थानांत अशा तऱ्हेनें रंगविलेले दिवाणखाने पुष्कळ दृष्टीस पडतात. बंगाल्यांत असलें काम फारच क्वचित आढळतें. दिल्ली, अमृतसर, लाहारे, विजापूर, इत्यादि ठिकाणीं भिंतीवर काढिलेली मुसलमानी तऱ्हेची चित्रें पुष्कळ आढळतात. उत्तर हिंदुस्थानांतील झाडांचें लांकडी कामही रंगविलेले असते. लांकडावर कापड किंवा तागाचे धागे पसरून त्याजवर सरस व सफेता चढवितात, व त्याजवर कथिलाचें पातळ पान म्हणजे बेगड चिकटवितात. या बेगडीवर पाण्यात मिसळलेल्या रंगांनी चित्रें काढून त्यांजवर रोगणाचा हात चढवितात. रोगणाचा रंग पिवळा आहे, त्यामुळें तेंं सुकलें म्हणजे पांढऱ्या बेगडीवर सोन्यासारखें चमकतें, व त्याच्या जवळील पारदर्शक निळे व इतर रंग धातूच्या आंगच्या किरणपरावर्तनशक्तीमुळे लखलखतात. अशा रीतीनें रंगविलेले दरवाजे व छतें फारच सुरेख दिसतात. अलीकडे विलायतेहन येऊं लागणाऱ्या रंगांतील मुख्य घटकावयव अळशीचें तेल हेंं आपल्या देशांत उत्पन्न होते असूनही त्याचा उपयोग आपल्यास माहित नव्हता.

 " जयपूर येथे सांदल्याचे काम फारच चांगले होते. ठिकठिकाणी पांढऱ्या किंवा तांबड्या सांदल्याची चित्रें काढून रंगविलेल्या जमिनी दृष्टीस पडतात. दिवाणखान्यांतील भिंतीचा दोन तीन फूट उंचीचा खालचा भाग अशाच तऱ्हेनें सुशोभित केलेला असतो, व त्याजवर अनेक तऱ्हेची वेलबुट्टी असते उष्णकटिबंधांत बांधलेल्या घरांस शोभा आणून तीं थंडही ठेवण्याचें काम अन्य रीतीने होण्याचे कठीण. या भिंतीवरील नक्षीची चित्रं कधी कधी फारच सुरेख असतात. आपल्या रहात्या घराच्या भिंती आंतून व बाहन रंगवून त्यांजवर हत्ती, उंट, घोडे, पायदळ वगैरे लष्करी चित्रें किंवा पुराण-प्रसिद्ध पुरुषांची चित्रें काढून त्यांस सुशोभित करण्याची जयपूर या राजधानींत व राजपुताना प्रांतांतील इतर गांवीं सर्वसाधारण चाल आहे. या देशांतील चित्रकारांस शिकवून तयार करण्याच्या ह्या अशा प्रकारच्या शाळाच घरोघरीं घातल्या आहेत असें म्हटलें तरी चालेल.” [ डाक्टर हेंडले. ]

 अलवार प्रांती घरांच्या भिंतीवर रंगारंगाची चित्रें काढून त्यांजवर रंगीबेरंगी कांचेचे तुकडे चिकटवून व सोनरी वर्ख चढवून त्यांस फारच शोभा आणलेली असते. येवलें येथें मामलेदार कचेरीजवळ एक मशीद आहे; या मशिदीच्या