पान:देशी हुन्नर.pdf/186

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ १८८ ]

कालवितात व पांच दिवस झाकून ठेवितात. सहावे दिवशीं पट्टी उपयोगास लावतात, छापतांना पितळेचा ठसा घेऊन त्यांत तीं धालून कापडावर तिची नक्षी उठवितात. हा ठसा सुमारें एक इंच लांब व अर्धा इंच घेराचा असतो. त्याच्या खालच्या बाजूस पत्रा बसवून त्यांत नक्षी आरपार खोदलेली असते. ठशांत पट्टी (खडी ) घालून पिचकारीच्या दांडी प्रमाणें लांकडाच्या दांडीनें चेपली ह्मणजे, ती कापडावर पडून तिचा छाप वठतो. डाव्या हातांत कापड घेऊन, जेथें छाप मारावयाचा त्या जागेच्या खालीं मधलें बोट धरून, त्याच्या शेवटल्या पेराच्या आतल्या मऊ भागावर कपडा धरून, त्याजवर ठसा ठेवून, त्यातील दांडी चेपून, व फूल वठविणें इतकी क्रिया हे कारागीर लोक जलद व इतक्या चपळाईनें करतात कीं, त्यांजकडे पाहिलें असतां,

 " भात्यांतून बाण काढतो केव्हां, धनुष्यावर ठेवतो केव्हां, गुणाशी जोडतो केव्हां, ओढतो केव्हां, आणि सोडतो केव्हां, हें कोणाच्याही समजुतींत येऊं दिलें नाहीं."

 या वाक्याचें स्मरण होते.

 खडीची नक्षी कापडावर छापली म्हणजे ओली आहे तोंच त्याजवर अभ्रकाची वस्त्रगाळ पूड टाकून, ती कमजास्त लागली असेल तर झटकून कपडा सुखत टाकितात. अभ्रकाच्या बदला कधीं कधीं सोनेरी वर्ख चिकटवितात.

 खडीचें काम करण्यास लागणारी अभ्रकाची पूड तयार करण्याची कृति खालीं लिहिली आहे:--

 अभ्रकाचे पहिल्यानें बारीक बारीक तुकडे करितात, व ते कापडाच्या पिशवींत घालून त्यांत भात [साळी ] मिसळतात, आणि पिशवी हातांत गच्च धरून एका भांडयांत पाणी घेऊन त्यांत बुडवून डाव्या हाताच्या तळव्यावर धरून खूप कुसकरतात. साळीच्या कठीण कवचाचें व अभ्रकाच्या तुकड्यांचें घर्षण झालें ह्मणजे अभ्रकाचा चुराडा होतो, आणि तो पाण्यांत मिसळून कपडयांतून गळून भांड्यांत पडतो. मग त्यास पुनः पुनः धुवून स्वच्छ करून सुखवून ठेवितात.

 मोरवी, व अमदाबाद या गांवीं कलमानें खडीची नक्षी कापडावर काढण्याची चाल आहे. त्यांत ठशाची जरूर लागत नाहीं.