पान:देशी हुन्नर.pdf/185

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ १८७ ]

रंग आंत शिरून, थोड थोडा कापडास लागावा या हेतूनें ते तीन वेळ बांधावें लागतें. ह्या पांढऱ्या किंवा तांबूस ठिपक्यांत गुजराथेत ' कांडा ' ह्मणतात. कापडास तांबडा रंग चढला ह्मणजे तें गुळीचे ' मिठापीप ' म्हणून मागें वर्णन केलें आहे त्यांत बुडवितात. त्यांतून काढल्यावर हर्ड्याच्या पाण्यांत बुडवितात, व अखेरीस गुळीचा काळा रंग करण्याची कृति सांगितली आहे त्यांत वर्णन केलेल्या हिराकसाच्या पाण्यात बुडवितात. आणि मग धुवून सुखवितात.

 गुळीच्या पाण्यात बुडविणें , हरड्याच्या पाण्यात बुडविणें व हिराकसाच्या पाण्यांत कापड बुडविणे हीं तिन्हीं कामें चार पांच तासाच्या आंत लवकर लवकर आटपावीं लागतात. नाहींतर सूत भिजवून त्यांतून काळा रंग आंत शिरूम कांड्यांचा ह्मणजे ठिपक्यांचा रंग बिघडवून टाकील अशी भीति असते. कापडावर काळा रंग चढला ह्मणजे गांठीचें सूत तोडून टाकितात.

 हेंच कापड प्रथमतः एकटाच तांबडा रंग दिल्यावर मुखवून त्याच्या गांठी तोडल्या तर त्याजवर तांबडया रंगाच्या जमिनीवर पांढऱ्या ठिपक्यांची नक्षी दिसते, परंतु त्याजवरच तीन वेळ तांबडा रंग चढवून नंतर काळा चढविला ह्मणजे काळ्या जमिनीवर तांबूस रंगाची नक्षी दिसूं लागते.

खडीची छापणी.

 पंढरपूर, पुणें, नाशिक व मुंबई या ठिकाणीं खडीचे खण छापतात. खडीच्या खणाप्रमाणें 'टेबल क्लाथ' व पडदे छापवून साहेब लोकांत विकण्याची सुरुवात झाली होती, परंतु आलीकडे याही धंद्यांत कांहीं अर्थ राहिला नाहीं. हल्लीं घाटावरील गरीब लोकांच्या बायकांकरितां खडीचे खण छापून तयार होत असतात.

 खडी ह्मणून एका प्रकारची माती बेदर शहराजवळ मिळते. तिचा हें काम करण्यांत उपयोग होतो असा लोकांचा खोटा समज पडल्यामुळें त्यास 'खडीची' छापणी असें नांव पडलें आहे. परंतु पट्टी खडीशिवाय तयार होते. हे खालीं दिलेल्या माहितीवरून लक्षात येईल.

 पट्टी तयार करण्यास जवसाचें तेल व राळ एका ठिकाणीं शिजवून तयार केलेल्या रोगणांत सफेता कालवावा लागतो. हें रोगण तयार करूनच ठेविलेलें असतें. पुढें जसें जसें काम लागेल तशी तशी सफेत्याची पूड घेऊन त्यांत