पान:देशी हुन्नर.pdf/169

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ १७१ ]

' इजिप्शियन अलम ' या नावानें युरोप खंडांत प्रसिद्ध असलेली तुरटी मिसर देशांतील नसून हिंदुस्थानांतीलच आहे असें सिद्ध झालें आहे. त्याप्रमाणें हे रंगही पूर्वी हिंदुस्थानांत होऊन नंतर इजिप्त देशांतून युरोपांत आले असावे, रंगास तुरटी लागते व ती तर कच्छ प्रांतीच उत्पन्न होते. तसेंच हिराकस वगैरे लोखंडाचे क्षार हिंदु लोकांत माहीत आहेत. आमलेल्या दारूंत किंवा भाताच्या पेजेंत लोखंड घालून त्याजपासून ते लोक कांहीं क्षार तयार करितात. हिंदु लोकांस आम्ल व आल्केली पदार्थ पुष्कळ माहीत आहेत त्यामुळे एकाच रंगामध्ये त्यास अनेक फरक करितां येतात."

 रंगांत फरक ह्मणजे काय ? हें समजण्या करितां एक उदाहरण देणें अवश्य आहे. तें असें--एक कुसुंबा रंग उदाहरणार्थ घेतला तर त्याचा पहिल्यानें मोतिया रंग होतो, नंतर प्याजी, नंतर गुलाबी, मग गहिरा गुलाबी, मग नारिंगी, गुलियानार, तांबडा, कुसुंबी, व तेलिया इतक्या प्रकारचा फरक पाडितां येतो.

 युराेप खंडांत हल्लीं सुद्धां प्रचारांत असलेल्या कपडे रंगविण्याच्या युक्त्या हिंदुस्थानांतूनच तिकडे गेल्या आहेत ही गोष्ट निर्विवाद आहे तरी इतकें लक्षांत ठेविले पाहिजें की ह्या युक्त्या जरी प्रथम आपल्या देशांत निघाल्या तरी त्यांत पुढें कोणत्याही रीतीची सुधारणा झाली नाहीं; मग ती जातिभेदामूळें ह्मणा, राज्यक्रांतीमुळें ह्मणा, अथवा धर्मभोळेपणामुळें म्हणा.

 प्रस्तुत काळीं काश्मीर, पंजाब व सिंध या प्रांतांत जसा रंग होतो तसा कोठेंच होत नाहीं. आमच्या इलाख्यांतील रंगारी लोक पूर्वी सिंध प्रांतांतून आले अशी दंतकथा आहे. व सिंधी लोक ज्या धंद्याबद्दल मोठा अभिमान बाळगतात तो धंदा उदयास येण्यास आसीरियन, इजिप्शियन्, बाबिलोनियन्, व परशियन् लोक (इराणी, दुराणी, मिसर, वगैरे लोक यांच्यांत प्राचीन काळीं व्यापाऱ्याचा भरभराट होता, त्यांचें आमचें दळण वळण होतें, व आमचा माल त्यांच्या देशांत पुष्कळ खपत असे, ह्या गोष्टी कारण झाल्या असाव्या).

 मोगली राज्यांत शिल्पकला, चित्रकला, व इतर कौशल्यास पुष्कळ उत्तेजन मिळालें. त्याप्रमाणें कपडे रंगविण्याच्या विद्येसही मुसलमानी राज्यकर्त्यांकडून उत्तेजन मिळालें. ह्यांत शंका नाहीं. अलीकडे मात्र विलायती माल येऊं लागल्यामुळें देशांतील रंगारी लोकांचा धंदा बुडत चालला आहे.