पान:देशी हुन्नर.pdf/168

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ १७० ]

फार जातें त्यामुळें विलायत सरकारानें त्याजवर जबरदस्त कर बसवून पाहिला, त्यानेंही कांहीं वळेना तेव्हां हिंदुस्थानांतील चीट वापरूं नये असा कायदा काढणें त्यास भाग पडलें. तेंच हिंदुस्थान प्रस्तुत काळीं विलायती चिटांनीं ओतप्रोत भरून गेलें आहे. इतकेंच नाहीं तर विलायती रंगाची गलबतांचीं गलबतें आमच्या देशांत येऊं लागल्यामुळें देशी मालच तयार होण्याचें बंद होत चाललें आहे.

 आमच्या देशांत कपडे रंगविण्याची विद्या फार प्राचीन काळापासून अवगत असावी यांत शंका नाहीं. सुमारें २५०० वर्षांपूर्वी आमचे पूर्वज रंगविलेलें कापड वापरीत असत असें ग्रंथाधारावरून सिद्ध करितां येतें. ख्रिस्ति शकाच्या पूर्वी ५४३ व्या वर्षी काश्यपाच्या आज्ञेवरून एक सभा भरली होती तींत आलेले भिक्षु ( बौद्ध धर्माचे संन्यासी ) भगवीं वस्त्रें नेसून आले होते, असें त्याच वेळीं फोको नांवाच्या एका चिनई विद्वानानें लिहून ठेविलें आहे. त्यांत बायकांचे कपडे पिंवळ्या रंगाचे होते असें तो ह्मणतो.

 निजामशाहींत अजंटा लेणीं आहेत व मध्य हिंदुस्थानांत बाघ या नांवाचीं लेणीं आहेत. हीं दोन्हीं लेणीं ख्रिस्ति शकाच्या पूर्वी सहाव्या शतकांत रंगविलेलीं आहेत असें सिद्ध झालें आहे. या लेण्यांतील चित्रांकडे पाहिलें ह्मणजे तांबड्या, निळ्या व पांढऱ्या पट्ट्यांचें कापड पूर्वीचे लोक वापरीत असत असें सिद्ध होतें. या कापडास काठ्यावाड आणि कच्छ या प्रांतीं तिपटो असें नांव असुन तेथील स्त्रिया ते कापड अझून वापरितात. बाघ येथील लेण्यांत डाक्टर भाऊ दाजी यांणीं एक चित्र पाहिलें त्याच्या आंगावर बांधणी कामानें रंगविलेला कपडा होता. हें बांधणी काम कच्छ, काठयावाड, जयपूर या प्रांतीं अझूनही पुष्कळ होत असतें. सन १८५१ सालच्या इंग्लंडांतील प्रदर्शनाबद्दल रपोट लिहितांना मेहेरबान रायल साहेब यांनी खालीं लिहिलेला मजकूर लिहिला आहे.

 " हिंदुस्थान देशांत कपडें रंगविण्याची कळा फार प्राचीन काळापासून माहीत आहे असें ग्रीस देशांतील प्लीनी नांवाच्या एका विद्वानाच्या ग्रंथावरून सिद्ध होतें. हिंदु लोकांच्या लष्करांत रंगारंगांचीं निशाणें फडकत होतीं असें या इतिहासकारांनीं लिहून ठेविलें आहे. कपडे रंगविण्याची विद्या हिंदु लोक मिसर देशांतील लोकांपासून शिकले असें कित्येकांचे ह्मणणें आहे परंतु त्यास कांहीं आधार नाहीं. उलटें ज्याप्रमाणें