पान:देशी हुन्नर.pdf/164

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ १६६ ]

सिंधप्रांतीं, हैदराबाद, कराची, व शिकारपूर इत्यादि ठिकाणीं रेशमी कापड पुष्कळ तयार होतें त्याची विणकर वगैरे पंजाबांतील कापडासारखीच असते.

 'एरी' आणि 'मुगा' या नांवाच्या रेशमाचें कापड मुख्यत्वें आसाम प्रांतीच होतें. एरी या नावानें प्रसिद्ध असलेलें रेशीम कांततां येत नाहीं. तर त्यास कापसासारखें पिंजून मग त्याचें कापड विणावें लागतें त्यामुळें तें जाडें भरडें होतें खरें तरी तें टिकाऊ असतें म्हणून गोरगरीब लोक विशेषत्वें त्याचाच उपयोग फार करितात.

लोंकरी कापड.

 मेंढ्यांची लोंकर या देशांत उंची कपड्याकरितां वापरींत नाहींत. तिच्या घोंगड्या व बुरणूस होतात. काश्मीरदेशांत एका जातीच्या बोकडाच्या लोंकरीपासून शाली तयार होतात. सिंधप्रांतीं उंटाच्या लोंकरीपासून चोगे व इतर कपडे तयार करितात. या देशाची हवा उष्ण असल्यामुळें येथील लोकांस लोंकरीच्या कापडाची विशेष जरुरी लागत नाहीं. तशांत 'रूदार ' अंगरखे तयार करून ते थंडीच्या दिवसांत वापरण्याची आपल्या लोकांस विशेष आवड आहे, त्यामुळें लोकरीचा कपडा येथें कमी खपतो. काश्मीर व पंजाब या देशांत लोंकरीचें कापड पुष्कळ तयार होतें. मारवाडांत धाबळ्या होतात, व दक्षिणेंत घोंगड्या चांगल्या होतात. पंजाबांत लाहोर, रोटक, शिरसा, कसूर, फिरोजपूर, हुशारपूर, गुजरणवाला, रावळपिंडी, झेलम व नूरपूर या सर्व गांवीं लोंकरीचे कपडे तयार होतात. रामपुर आणि बसाहीर येथील एका प्रकारच्या मेंढयांच्या लोंकरीपासून पूर्वी कपडे तयार करीत असत. हल्लीं हिमालयाच्या आसपास मात्र तसले कपडे होतात. चंबा येथें गड्डी या नांवांचे धनगर जातीचे लोक आहेत ते थंडी पासून आपलें रक्षण होण्याकरितां लोंकरीचे कपडे वापरतात. राजपुतान्यांत जयपूर, अजमीर, बिकानेर, आणि जोधपूर, या गांवीं उंची बुरणूस तयार होतात. अजमीर जिल्ह्यांत तोडगर गांवीं होत असलेल्या बुरणुसांची विशेष ख्याति आहे. वायव्य प्रांतीं मिरत आणि मुजाफर नगर या दोन गांवांतील लोंकरी कपड्यांची विशेष ख्याति आहे. अयोध्या प्रांतीं बाहारयीक या गांवांतील लोकरी कपड्याची. ही विशेष ख्याति आहे. बंगाल्यांत आरा, गया, आणि सीतामऱ्ही हे तीन गांव लोकरी कापडाविषयीं मोठें प्रसिद्ध आहेत. वायव्येकडे लोंकरी कापडांत लोई ह्मणून एक प्रकारचें कापड तयार होतें तें लाहोर, शिरसा, लुधियाना, आणि अमृतसर येथें विणतात. 'पट्टु' या नांवाच्या कापडाचे पंजाबांतील डोंगराळ