पान:देशी हुन्नर.pdf/163

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ १६५ ]

तुरईच्या पुढें आढयास टांगलेला हात्या असतो. हात्यांत फणी बसवितात. कापड विणतांना एकएक लिखडी धोट्यांत बसवून धोटें उजवीकडून डावीकडे व डावीकडून उजवीकडे फेंकतात. दर खेपेस धोटें इकडून तिकडे गेलें ह्मणजे फणीनेंं आडवा धागा सारखा बसवितात. फणीच्या पुढें आढयास टांगलेल्या सुतळीच्या वया असतात. मागाच्या दुसऱ्या टोंकास आडवी काठी असते तीस आटा ह्मणतात. वर सांगितलेला ताणा आट्यावरून दुमटून घेऊन त्याच्या टोंकांस एक दारे बांधून तो दोर तुरईजवळ परत आणून एका मेखेस बांधून ठेवितात. कांहीं कापड विणून तयार झालें ह्मणजे आट्याचा दोर सईल करून तुरईचा पेंच खेंचून घेऊन तयार झालेलें कापड तिजवर गुंडाळितात. ताण्याच्या धाग्यांतील वेगवेगळे थर एकमेकांत गुंंतूं नयेत ह्मणून त्यांत आडवी काठी घालतात तीस 'सांध ' किंवा 'कैचि' असें नांव आहे. कापड विणून तयार झाल्यावर त्याचे जरीचे कांठ किंवा पदर अकीकाच्या मोगरीनें घोंटून साफ करितात.
 रेशमी कापड येवल्यास तयार होतें. त्याप्रमाणें पुण्यासही तयार होतें. त्यांत कद, पीतांबर, फडक्या, पैठण्या, लुगडीं व खण हे प्रकार आहेत. येवल्यास शेट गंगाराम छबीलदास यांचे दुकान प्रसिद्ध आहे. व पुण्यांत शेट हिंदुमल्ल बाळमुकुंदचें विशेष प्रसिद्ध आहे. येवल्यांच्या दुकानांची मालकी हल्लीं शेट नथुभाई शामलाल यांजकडे आहे, व पुण्यांतील सदरील दुकानाची व्यवस्था शेट रामनारायण यांचेकडे आहे. अमदाबादेस शेट चुनीलाल फत्तेचंद याचे वतीनें माल आणवितां येतो. सुरतेस हजी अल्लीभाई यांचें दुकान मोठें प्रसिद्ध आहे. मुंबईत आंग्रयाचे पेढीजवळ खाऱ्या कुव्यानजीक गंगाराम छबीलदास याचीही पेढी आहे तेथें येवलें येथील पाहिजे तो रेशमी माल मिळतो.
 सुरत, खंबायत, व बडोदें या ठिकाणीं 'पटोलो' ह्मणून एका प्रकारचें रेशमी कापड निघत असतें, त्याची जितकी स्तुति करावी तितकी थोडीच आहे. हें कापड विणतांना पहिल्यानें उभे घालावयाचे दोरें घेऊन त्या सुमारें वीस वीस दोऱ्यांस मध्यें मध्यें नियमित स्थळीं सुताचे कट देऊन नंतर ते दोरे पिंवळ्या रंगांत बुडवितात. पुनः त्यांस नियमित स्थळीं कट देऊन तांबड्या रंगांत बुडवितात. पुनः नियमित स्थळीं कट देऊन जांबळ्या रंगांत बुडवितात. याप्रमाणें आडवे घालण्याच्या दोऱ्यांचे कट बांधून ते रंगवून तयार झाल्यावर ते सर्व कट सोडून त्यांची विणणावळ अशी कुशलतेनें करितात कीं स्वस्तिकाच्या रंगासारखे ते ते रंग त्या त्या जागीं सारखे सुशोभित होऊन तयार झालेल्या कापडांत चांगली नक्षी दिसते.
   २१