पान:देशी हुन्नर.pdf/161

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ १६३ ]

रेशमाचें कापड विणण्याचें काम करूं नये व त्या चोर व बंडखोर वगैरे लोकांपासून रघोजीनायकाचे घराण्यांतील नाईक यांनीं रक्षण करावें. नवीन व्यापाऱ्यांस परवानगी मिळण्यापूर्वीं साडेतीनशें रुपये कर द्यावा लागत असे. त्यांतील सवा रुपया काजीस व साडेबारा रुपये पेशवे सरकारास देऊन बाकी राहिलेल्या पैशाचा तेथील रहिवाशी रेशमी काम करणाऱ्या लोकांचे सामाजिक भोजनाकडे खर्च होई. हा नियम पेशवाई बुडाल्यावरही सन १८३७ सालापर्यंत इंग्रज सरकारानें चालविला होता. ३७ सालीं बापू नांवाच्या एका मनुष्यानें रेशमाचा कारखाना काढण्याचे परवानगीबद्दल असिस्टंट कलेक्टरकडे अर्ज केला तो असिस्टंट कलेक्टरानें नामंजूर केला व तो पुढें अपिलांत कलेक्टराकडेही नामंजूर झाला. पुढें रेविन्यू कमिशनराकडे काम चालून आठ वर्षांनीं ह्मणजे सन १८४५ सालीं त्यास परवानगी मिळाली. तथापि गुजराथी लोक स्वस्थ बसले नाहीं. त्यांनीं तारीख २६ जानेवारी सन १८४८ रोजीं सिव्हील कोर्टात नुकसानाबद्दल फिर्याद करून आपल्या वतीचा निवाडा करून घेतला. पुढें त्याजवरही अपिलें होतां होतां तारीख २४ जून १८६४ सालीं हायकोर्टानें खटल्याचा अखेर निकाल करून हा कर बुडविला. तेव्हांपासून येवल्यास बाहेरगांवचे व्यापारी पुष्कळ येऊन राहूं लागले. हल्लीं तेथें २५० खत्री, ३०० कोष्टी, २०० साळी, व २५ मुसलमान आहेत. येवल्यास लागणारें सर्व कच्चें रेशीम मुंबईहून न्यावें लागतें. त्यांत चिनी, बंगाली व इराणी असे तीन प्रकार आहेत. मुंबईच्या बाजारांत कच्चया रेशमास जातीवरून व चांगलेपणावरून वेगळीं वेगळीं नांवें पडलीं आहेत. जसें अव्वल, दुय्यम, लंकीन्, सीम, सालबाफी, चारन्, बाणक, शिकारपुरी, व पंजम. वीस वीस मुठ्यांची एक एक पेटी येतें ; त्या पेट्या वाणी, पटणी, ठाकूर, शिंपी व मुसलमान व्यापारी लोक मुंबईहून येवल्यास नेतात.

 येवल्यास गेलें ह्मणजे कच्चें रेशीम पहिल्यानें राहाटकऱ्याकडे जातें. तेथें तें कांतून तयार झालें ह्मणजे रंगाऱ्याकडे जातें. अखेरीस मागवाल्याकडे जातें. राहाटवाल्याकडे रेशीम गेलें ह्मणजे तो तें निवडतो ह्मणजे जाड, बारीक, ह्या मानानें त्याचे वेगळे वेगळे भाग करितो. या कामाकरितां कच्चें रेशीम पहिल्यानें एका फाळक्यावर टाकून त्याच्या समोर कातणारास बसावें लागतें. कांतणारा त्या रेशमाचें शोधून काढलेलें एक टोंक घेऊन तें एका असारीस बांधतो नंतर फाळक्याचा मधला दांडा डाव्या पायाच्या आंगठ्यानें धरून उजव्या हा