पान:देशी हुन्नर.pdf/160

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ १६२ ]

होऊं लागली आहे त्यामुळें पुढें हा व्यापार वाढेल असें वाटतें. निजामशाहींत रायचूर गांवीं रेशमी लुगडीं चांगलीं तयार होतात. हैदराबादेस मश्रु व संगी या नांवाचें कापड पुष्कळ तयार होतें त्याचा उपयोग मुसलमान लोकांच्या व पारशी लोकांच्या स्त्रियांस इजारी वगैरे करण्याकडे होतो. इंदूर व झेलमंडल या गांवीं रेशमी लुगडीं व खण तयार होतात. औरंगाबादेची रेशमी कापडाबद्दल फार वर्षांपासून प्रसिद्धि आहे. तेथें हिबु ह्मणून एक गजनीसारखें नकशीदार कापड होतें त्याचा श्रीमंत मुसलमान लोकांचे कबजे व टोप्या करण्याकडे उपयोग होतो.
 मुंबई इलाख्यांत रेशीम कोणीच उत्पन्न करीत नाहीं. मेजॉरे कौसमेकर नांवाच्या साहेबांनीं पुण्यास कांहीं खटपट केली होती परंतु व्यर्थ गेली. ठाणें जिल्हांत व मुंबई बेटांत रेशमाचे किडे पुष्कळ पाहाण्यांत आले आहेत परंतु त्याचा उपयोग कोणास ठाऊक नाहीं. इतकेंच नाही तर तो एकाद्यास दाखविला असतां तो निंदास्पदमुद्रेनें तोंडाकडे पाहून हसतो असें अनुभवास येतें. लहानपणीं खेळ खेळण्यास बाहेर डोंगरातून टसर रेशमाच्या किड्यांचें कोशेटे आणून त्यांचा खेळांत उपयोग आह्मीं करीत होतों परंतु हे रेशमाचे किडे ही गोष्ट बावीस वर्षांचे वय होईपर्यंत सांगणारा कोणीच मिळाला नाही. यावरून मुंबई इलाख्यांत रेशमी कपडे विकण्याकरितां लागणारे सर्व रेशीम परदेशांतून आणावें लागतें हें सांगावयास नको. रेशमी कापड येवलें, पुणें, अमदाबाद, सुरत व ठाणें याठिकाणीं होते. त्यांत ठाणें खेरीजकरून इतर सर्व ठिकाणी जरीचा म्हणजे कलाबतुचाही उपयोग होतो. सासवड, बेळगांव, रेवदंडा, कलादगी आणि सोलापूर याठिकाणीं रेशमी किंवा गर्भसुती लुगडीं तयार होतात. येवल्यास रेशमाचें कापड विणण्याच्या संबंधानें चार हजार कुटुंबांचा निर्वाह चालला आहे. पैठण्या, पितांबर, लुगडीं, फडक्या, व खण या जिनसांबद्दल येवल्याच्या पेंठेंची मोठी आख्या आहे. तेथें हल्लीं रेशमी कापड विणण्याचे माग ९२५ आहेत. हिजरी सन ११५५ या वर्षांपर्यंत येवलें हें अगदीं लहानसें खेडें होतें. या साली रघोजी नाईक नांवाच्या एका सरदारानें शामदास वालजी या नांवाच्या एका गुजराथ्यास हातीं धरून पैठण व औरंगाबाद येथील रेशमी कापड विणणारे लोक आणवून पेंठ वसविली. त्या आणलेल्या लोकांस रघोजी नायकानें दोन प्रकारचीं अभिवचन व लेख दिलें होते ते असे कीं, त्या लोकांखेरीज दुसऱ्या कोठेंही राहणाऱ्या लोकांनीं हुकूमाशिवाय तेथें