पान:देशी हुन्नर.pdf/162

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ १६४ ]

तानें तो असारी भिंगरीसारखी फिरवितो. त्यामुळें रेशीम फाळक्यावरून असारीवर जातें. या प्रसंगी तें दोन बोटांत धरून हळूच चांचपून पाहतो व त्यांत बारीकपणांत कमजास्ती प्रकार आढळला ह्मणजे तितकाच तुकडा तोडून पुढला भाग दुसऱ्या असारीवर चढवितो अशा रीतीनें नुसत्या बोटाच्या मदतीनें रेशमाचे प्रकार निवडून काढून वेगवेगळ्या असाऱ्यांवर काढून घेतल्यावर, 'तात' ह्या नांवाचें त्याच्याजवळ एक यंत्र असतें त्या यंत्रावर देवनळाच्या लहान लहान गरोळ्या बसविलेल्या असतात, त्यांसभोंवतीं तो तें रेशामाचे तंतू पुढें गुंडाळतो. शेजारच्या दोन गरोळ्यांवरील धागे एका बांगडींतून बाहेर काढून ढोल ह्मणून एक पिंजरा असतो त्यावर अडकवितो, व पीळ पडलेले रेशीम ढोलावरून फाळक्यावर काढून घेतो. रेशमाचे दोन तंतू एक ठिकाणीं गुंडाळलेले असले म्हणजे त्यास “ दोन तार शेरिया" असें म्हणतात. हेंच दोन तार रेशीम पुन: गरोळ्यावर चढवून त्यास पुनः पीळ दिला ह्मणजे चारतार असें म्हणतात. रेशीम कातणारास त्याच्या यंत्रावरून 'रहाटवाला' असें नांव पडलें आहे.
 कांतलेल्या रेशमास शेरिया असें ह्मणतात. शेरिया तयार झाल्यावर व्यापारी लोक त्यास रंगाऱ्याकडे पाठवितात. (रंगाबद्दल माहिती पुढें पहा.)
 रंगवलेलें रेशीम व्यापारी लोक मागवाल्याकडे पाठवितात. मागवाला तीन कामें करितो; एक खळ देण्याचें, दुसरें ताणा तयार करण्याचें, व तिसरें विणण्याचें. ताणा ह्मणजे मागावरील उभ्या दोऱ्यांचा समुदाय. रेशीम तनसाळेवर सारखें ताणून घेऊन त्याजवर खळ चढवून तें सुखविलें ह्मणजे ताणा तयार होतो. मागावर लागणाऱ्या आडव्या धाग्यास वाणा ह्मणतात. फाळक्यावर रेशीम चढवून तें राहाटीच्या योगानें लीखडीवर चढवितांना त्यास खळीच्या ऐवजीं गोंदाचें पाणी लावतात.

 ताणा तयार झाल्यावर तो सांधणाराच्या स्वाधीन करितात. सांधणार प्रत्येक धागा खळींतून बाहेर काढून मागावर असलेल्या पूर्वींच्या धाग्यास गांठ मारून बांधतो. नंतर सर्व धागे सारखे पसरून मागाच्या दुसऱ्या टोंकाजवळ "आटा" असतो त्यावरून घेऊन बांधून ठेवितो.

 रेशमी कापड विणण्याचा माग आठपासून पंधरा फूट लांब, व चारपासून सात फूट रुंद असतो. त्याच्या एका टोंकाखाली मोठा खळगा असतो, त्यांत पाय टाकून साळीलोक कामावर बसतात. साळ्याच्या पुढेंच एक चौकोनी आडवी तुरई असते. या तुरईभोवती कापड विणलें ह्मणजे गुंडाळलें जातें.