पान:देशी हुन्नर.pdf/129

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ १२३ ]

 मद्रास इलाख्यांत विजागापट्टण येथें पेट्या वगैरे करण्याकडे लागणाऱ्या जाळी कामास हस्तीदंताचा उपयोग होतो. त्रावणकोराची मात्र हल्लीं मोठी कीर्ति आहे. सन १८५१ साली त्रावणकोराहून एक हस्तीदंती सिंहासन लंडन येथील प्रदर्शनांत पाठविलें होते, व तेंच पुढें राणीसाहेबांस बक्षीस देण्यांत आलें. हें सिंहासन राणीसरकारच्या राज्यांत तयार होणान्या अत्युत्तम चिजांपैकीं एक उत्तम चीज आहे असें ह्मणतात. लंडन शहरांतील साऊथ केन्सिंगटन नांवाच्या सर्वसंग्रहालयांत आह्मीं टिपुसुलतानाच्या दोन हस्तीदंती खुर्च्या पाहिल्या आहेत. त्यांजवरील कामही फारच सुरेख आहे. त्रावणकोर येथून लंडन प्रदर्शनांत तसबिरीच्या चौकटी, आरशाच्या चौकटी, फण्या, कागदावर ठेवावयाचीं वजनें इत्यादि जिनसा गेल्या होत्या. पुणें प्रदर्शनांत एक देवीची मूर्ति, एक आरशाची चौकट, एक फणी, व एक कागद कापावयाची सुरी, इतक्या जिनसा आल्या आहेत. बडोदें संस्थानांतून त्रावणकोरच्याच कामाचे सुंदर नमुने आले आहेत. त्यांत कागदावर ठेवावयाचीं दोन वजनें आहेत त्यांचें वर्णन करावें तितकें थोडें. एकाच ठिकाणीं सर्प, पक्षी, पक्ष्यांचीं घरटीं, शिंप्या, तलवार, सुपाऱ्या व आणखी अनेक जिनसा अशा कांहीं सुबक रीतीनें खोदिल्या आहेत कीं त्याजकडे पहात रहावेसें वाटतें.

 पुण्यांत कसबा पेठेंत गणपतीच्या देवळा समोर फण्या, डब्या, व फांसे इत्यादि जिनसा होतात. पुण्याहून कलकत्ता प्रदर्शनांत भिवा मेस्त्री याच्या हातचा एक मुरलीधर आह्मीं एका मारवाड्याच्या येथून विकत घेऊन पाठविला होता. कच्छ, भूज, येथून एक ३८५ रुपयाची पेटी कलकत्यास गेली होती. तीच पेटी हल्लीं मुंबईच्या हुन्नर शाळेंतील सर्व संग्रहालयांतून पुणें प्रदर्शनांत आली आहे.

 आसाम प्रांती पूर्वीच्या संस्थानिकांच्या पदरीं असलेल्या कारागिराचे कांहीं वंशज जोरहाट या गांवीं हस्तीदंतावर काम करितात. त्यांत आपले पंख साफ करीत असलेले बगळे, व तोंडांत सर्प धरलेली सुसर या दोन चित्रांची तेथील कारागिरांस विशेष आवड असल्यामुळें तींच फार करितात.

 ब्रह्मदेशांत मौलमीन व रंगून या दोन गांवीं हस्तीदंताचें काम होतें. त्याचें मेहेरबान टिली साहेबांनीं खालीं दिलेल्या प्रमाणें वर्णन केलें आहे.