पान:देशी हुन्नर.pdf/128

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ १२२ ]

बरद्वान, टिपेरा, चितागांग, डाका, पाटणा, त्रावणकोर आणि पुणें या ठिकाणांहून हस्तीदंती काम गेलें होतें. त्यांत मुर्शिदाबादेहून आलेलें काम पुष्कळ होतें. हल्लीं मूर्शिदाबादेस सुद्धां हें काम पूर्वी सारखें होत नाहीं व वीस वर्षांपूर्वी तेथें जितके कारागीर होते त्यांतला चौथा हिस्सा सुद्धां आजला शिल्लक नाहींत. अशी या धंद्याची रड आहे.

 ओदिया व बहार या दोन प्रांतांतील संस्थानिकांच्या दरबारीं हस्तीदंताचे काम करणारे कारागीर आहेत. दर्भंगाच्या महाराजानीं हस्तीदंताच्या बारीक शलांका करून त्याची एक हातरी तयार करवून कलकत्त्यास पाठविली होती. तिची किंमत १३२५ रुपये होती. इतका हस्तीदंत, उत्तम रीतीनें ब्रह्म देशांत कोरतात त्याप्रमाणें कोरला असता तर त्याच्याकडे पहात बसावें असें प्रेक्षकांस वाटलें असतें. परंतु या चटईत तें काय पहावयाचें होतें ? असो; रजवाडी काम. हस्तीदंताच्या गंजिफा, खेळणी, बुद्धिबळें, सोंगट्या, फण्या, पंखे, बांगड्या इत्यादि कांहीं पदार्थ इतर ठिकाणांहूनही कलकत्ता प्रदर्शनांत आले होते. सिलहद येथें हस्तीदंताच्या हांतऱ्या होतात.

 वायव्य प्रांतांत हस्तीदंताचें काम फारच थोडें होते. फक्त बनारस येथील महाराजानीं दोन कारागीर आपल्या नोकरीस ठविले आहेत. व अयोध्या प्रांतीं गोंडा जिल्ह्यांत कांहीं कारागीरलोक आहेत.

 पंजाबांत अमृतसर, दिल्ली, पतियाला, शहापूर, मुलतान आणि लाहोर याठिकाणी हस्तीदंताचें जुजबी काम होतें. फण्या, कागद कापावयाच्या सुऱ्या, लहान डब्या, व चुडे या जिनसा अमृतसर येथें होतात. दिल्लीचे कांहीं कारागीर चित्रें वगैरे खोदितात. शहापूर येथील बुद्धिबळाची प्रसिद्धी आहे. मुलतानचे चुडे व खेळणीं आणि लाहोरचे चुडे व फण्या याही कधीं कधीं विकावयास येतात. अमृतसर येथें हस्तीदंतावर जाळीचें काम फार चांगलें करितात.

 जयपुरास दोन तीन कारागीर आहेत. बांगडया, सुरमादाणी, व बाटलींत घातलेलें हस्तीदंताचें झाड असल्या कांहीं किरकोळ जिनसा बिकानेर येथें होतात. भरतपूरच्या चौऱ्या, पालीच्या सुरमादाण्या, अलवार येथील हत्ती, रेवा येथील गाई, बैल, घोडे इत्यादिकांचीं चित्रें; रतलाम, धार व अल्लीपुरा येथील फण्या, तलवारीच्या मुटी, व कागद कापण्याच्या सुऱ्या, लंडन येथील प्रदर्शनांत आल्या होत्या.