पान:देशी हुन्नर.pdf/118

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ ११२ ]

मध्य प्रांतांत चंदा या गांवीं, व भंडारा जिल्यांत कान्हेरी गांवीं, रत्नागिरी जिल्ह्यांतील दगड्यांप्रमाणें कांहीं किरकोळ जिनसा तयार होतात.
 राजपुतान्यांत जयपुर संस्थानांत संगमरवरी दगडाच्या मूर्ति, पुतळे, चित्रें वगैरे अनेक जिनसा विपुल होतात. पुणे प्रदर्शनांत या कामाचे तीन चारशें नमुने आले आहेत. एकटें जयपूर हिंदुस्थानांतून सर्व हिंदुलोकांस दगडाच्या मूर्ति पुरवितें. त्या रंगाने पांढऱ्या, गुलाबी व काळ्याही असतात, व त्यांजवर कधीं कधीं सोन्याच्या वर्खानें नक्षी केलेली असते. डंगरपुर येथें एका प्रकारचा दगड सांपडतो त्याच्या मूर्ति व चित्रें करून त्यांजवर तेल काजळ चढवून घोटतात., अगदीं पाढरासफेत संगमरवरी दगड सांबर सरोवराच्या जोधपुर संस्थानाच्या बाजूस असलेल्या मक्राणा गांवीं सांपडतो. यापेक्षां काही हलका व मधून मधून निळसर रंगाचे छटे असलेला असा दगड अलवार संस्थानच्या सरहद्दीजवळ रैयालो गांवीं सांपडतो. तो धौसा यागांवीं नेऊन तेथें त्याच्या मूर्ति वगैरे जिनसा करतात. हे पाथरवट लोक उन्हाळ्यांत मूर्तीच्या राशींच्या राशी तयार करून त्या गुजराथी साठेकऱ्यास विकतात. हे गुजराथी लोक याप्रमाणें घाऊक माल घेऊन गांवोगांव पाठवितात. मक्राणा येथील खाणीचे दगड पहिल्यानें जयपुरास जाऊन नंतर तेथें त्यांजवर काम होतें. अलवार संस्थानाच्या सरहद्दीवर व वळदंवगड म्हणून एक गांव आहे, तेथें काळ्या रंगाचा संगमरवरी दगड सांपडतो. त्याचेही असेच पुतळे बनतात. त्याच गांवीं गुलाबी रंगाचाही संगमरवरी दगड सांपडतो, त्याचे बहुत करून उंट करतात. पाथरवटाची लहान लहान मुलें पहिल्यानें दगडीच्या दगडाची चित्रें खोदण्यास शिकतात. व काम चांगले येऊं लागलें म्हणजे संगमरवरी दगड वापरतात. दगडीच्या दगडावरील चित्रें फार स्वस्त असल्यामुळें गोरगरीब लोकांत पुष्कळ खपतात.

 जयपुर येथील संगमरवरी दगडाच्या मूर्तीवर चितारी लोक रोखणीकाम करतात. जसलमिर, करवली, बिकानेर, भरतपुर, याठिकाणींही असलें सामान कधीं कधीं होते. मध्यप्रांतांत बिजावर, छत्रपुर, ओछी आणि अल्लिपुरा यागांवांची अशीच ख्याति आहे.

 बंगाल्यांत मोंगीर, गया, सासेरम, छोटानागपूर, ओरिसा, बरद्वान, व मानभूल येथें दगडाच्या मूर्ति वगैरे होतात, परंतु त्या वर्णन करण्यासारख्या चांगल्या नसतात. फक्त गयेस मात्र कांही पहाण्यासारखें काम होतें; व तें तीर्थस्थान अ-