पान:देशी हुन्नर.pdf/117

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ १११ ]
दगडी नकसकाम.

 'दगडावरील नक्षीचें खोदीव काम ' व 'शिल्प कामांत लागणारें दगडावरील कोरीव काम ', या दोन सदराखालीं या विषयांसंबंधानें मागें काही माहिती दिलेलीच आहे. आता या प्रकरणांत दगडाच्या नकस कामाच्या लहान लहान जिनसा कोठें कोठें होत असतात त्यांचें वर्णन दिलें जाईल. तसेंच आग्रा येथे संगमरवरी दगडावर होत असलेलें दगडी कोंदण काम याचेंही वर्णन करण्यांत येईल.

दगडावर खोदलेली नक्षी.

 ज्या ज्या ठिकाणी चांगलें खोदीव काम करतां येईल असे दगड सांपडतात त्या त्या ठिकाणीं कमजास्त मानानें दगडाच्या मूर्ति, सिंहासनें किंवा खेळणीं तयार होतच असतात. काठेवाडांत पोरबंदर व वढवाण या दोन गांवीं एका प्रकारच्या रेताड दगडाच्या कोरीव मूर्ति, प्याले, बशा, खेळणी, गाई, बै इत्यादि चित्रें, वगैरे जिनसा होत असतात. भावनगर व जामनगर या दोन ठिकाणी संगमरवरी दगड सांपडतो त्याचे लहान लहान पुतळे खोदून तयार करतात. कच्छ व बडोदा प्रांतीं कधीं कधीं असलें काम होते. कानडा जिल्ह्यांत नादिग या उपनांवाचे गृहस्थ आहेत, ते दगडीच्या दगडाचें सुबक कोरीव काम तयार करून त्यास कांहीं मालमसाला लावून तें विशेष टिकाऊ व टणक होईल असें करतात.

 गोंडळ संस्थानांतही संगमरवरी दगडाच्या जुजबी जिनसा तयार होतात. मोरवी संस्थानांत मच्छा नांवाची एक नदी आहे, तींत एका प्रकारचा काळाभोर दगड सांपडतो. त्याच्या खलबत्ते व नक्षीच्या बशा, पुतळ्या, वाटगे, कुत्रे इत्यादि जिनसा तयार होतात.

 सांवतवाडीस अलीकडे दगडाची भांडीं करून त्यांजवर नक्षी खोदून तींत पारा चढविण्याची सुरुवात झाली आहे.

 पंजाबांत असलें सामान फार थोडें होतें. दिल्ली, लाहोर, अमृतसर व चिनिअट ,या गांवीं कधीं कधीं दगडाचीं कोरीव चित्रें वगैरे विकत मिळतात. अमृतसर येथील सोन्यानें मढविलेल्या प्रसिद्ध देवळाच्या संबंधानें सरकारांतून एक चित्रशाळा स्थापन झाली आहे. तींत शीख लोकांचीं मुलें दगडाच्या लहान लहान सुरेख जिनसा तयार करीत असतात.