पान:देशी हुन्नर.pdf/119

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ ११३ ]

सल्यामुळें त्यास गिहाइकी बरीच मिळते. मोंगीर येथे आम्लर आणि कंपनी नांवाच्या एका व्यापारी मंडळीनें स्लेटीच्या दगडाचें काम करून त्यावर एका प्रकारचें रोगण चढवून तो संगमरवरी दगडासारखा दिसावा अशी युक्ति काढली आहे.

 वायव्य प्रांतांत आग्र्यास दगडीच्या दगडाचें कोरीव काम फारच सुबक होतें. मिरझापूर व इतर कांही गावी क्वचित् मूर्ति वगैरे करून काशी व प्रयाग येथें विकण्याकरितां पाठवितात.

 मद्रास इलाख्यांत दगडीच्या दगडाच्या तिणिताणी, चंद्रगिरी, सालेम कृष्णा, मदुरा, कडाप्पा व विजागापट्टण या ठिकाणीं कांहीं जिनसा होतात. हलाल, सैदापूर, अनंतपूर, पलादन, कडाप्पा, बुड्डियातम, त्रिचिनापोली व तंजावर या ठिकाणीं देवाच्या मूर्ति तयार होत असतात. ह्मैसुरासही कधीं कधीं मूर्ति तयार होतात. नुल्लुर गांवीं दगड्या तयार करणारे लोक आहेत.

आग्रयांतील संगमरवरी दगडांवरील कोंदणकाम.

 आग्र्यांतील ताजमहालांत असलेल्या कोंदण कामाचा आलीकडे इमारती बांधण्याकडे उपयोग न होतां साहेब लोकांस विकण्याकरितां त्या कामाचे प्याले, बशा, पेट्या, वगैरे पदार्थ तयार होत असतात. या कामांत पांढऱ्या रंगाच्या संगमरवरी दगडावर कोंदणें खोदून त्यांत रंगारंगाचे अकीक व इतर दगड बसवून वेलबुट्टी व फुलें काढिलेलीं असतात. आलीकडे मोत्याचे शिंपलेही कधीं कधीं बसवितात. परंतु ते चांगले दिसत नाहींत. कित्येक लोकांचें असें ह्मणणें आहे कीं ताजमहालाचें काम इटली देशांतील कारागिराचें आहे. ज्या वेळेस ताज महालाचें काम चाललें होतें त्यावेळीं लाहोर शहरीं फादर डाकास्ट्रो या नांवाचा एक पाद्री रहात असें, त्याच्या येथें १६४० सालीं फादर म्यानरिक् हा पाहुणा आला होता. त्यास त्यानें असें सांगितलें कीं ताजमहाल जिरोनिमो व्हेरोनियो नांवाच्या व्हेनिस शहरांतील एका शिल्पकारानें काढिलेल्या नकाशा वरून रचला आहे. व त्याच्या आंत असलेली कोंदण कामाची नक्षी आगस्टिन डी बोर्डो नांवाच्या फ्रेंच मेस्त्रीच्या नजरेखालीं तयार झाली आहे. दुसऱ्या बाजूनें दंत कथा अशी आहे की तुर्कस्थानांतील सुलतानानें इसा महंमद इफेन्डी नांवाचा एक शिल्पकार शहाजहान बादशहाकडे पाठविला होता. त्याच्या नकाशावरून ही इमारत बांधिली आहे. व सर जार्ज बर्डवुड साहेबानी "जर्नल आफ इन्डियन आर्ट',

   १५