पान:देशी हुन्नर.pdf/116

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ ११० ]

काढलेली आहे असें भासतें, त्यामुळें तसल्या तऱ्हेचीं टेबलें, नसत्या पोथीच्या फळ्या सारख्या फळ्या, इत्यादि जिनसांचा साहेबलोकांत खप होऊं लागला आहे. थित्सिया नांवाच्या एका झाडाचा रस साडेबारा भार काढून, त्यांत दहाभार हिंगूळ घालून, एकाप्रकारचा रंग तयार करितात. नंतर ज्यापेटीवर रंग द्यावयाचा असेल ती अगदीं गुळगुळीत करतात. लांकडास कोठें फाटफूट असेल तर सागाच्या लांकडाचा बारीक भुसा या रंगातच कालवून त्यांत भरतात. हें लुकण सुकलें ह्मणजे थित्सिचा रंग सर्व लांकडावर हातानें चोळतात. हातानें रंग लावण्यांत फायदा असा आहे कीं रंगांत कोठें बारीक केरकचरा गेला असला तर तो तेव्हांच कळतो. रंग लावल्यावर पेटी सावलींत सुकत ठेवतात. उनांत ठेविली तर लाखेला पोपडे येऊन भेगा पडतील अशी भीति असते. दोनतीन दिवसांनीं पेटी सुकली ह्मणजे थित्सीचा रस, तांदळाची पेज, व तुसाची राख, या तीन पदार्थापासून तयार केलेल्या लुकणाचा घट्ट थर देतात. ही पेटी पुनः सुकत ठेवावी लागते. सुकली ह्मणजे तिजवरील थर दगडासारखा टणक होतो. तो पाणी, तुसाची राख व दगडाच्या घोटण्या, या तिहींच्या मदतीनें अगदी गुळगुळीत करतात, तेव्हां त्याजवरील तकाकी नाहींशीं होते. नंतर त्याजवर काळें किंवा तांबडें रोगण चढवितात. तें अर्धवट सुकलें ह्मणजे हरताळ पाण्यांत घासून त्यांत गोंद घालून त्याची नक्षी काढतात. ही नक्षी तिच्या पूर्वी लावलेला थर अगदीं सुकण्यापूर्वी पुरी झाली पाहिजे. नक्षी काढल्यावर पेटीवर सोन्याचा वर्ख चिकटवितात. ज्या ठिकाणीं हरताळ लागलेला असतो त्या ठिकाणी वर्ख चिकटत नाहीं, व इतर ठिकाणीं तो चिकटतो. वर्ख चढिवल्यावर पेटी पुन्हा सुकत ठेवितात. ती अगदी सुकी टांक झाली ह्मणजे कापसाच्या बोळ्यानें पाणी घेऊन धुवून टाकितात. हरताळ धुपून गेला ह्मणजे त्याच्या खालीं असलेली तांबडी किंवा काळी लाख पुनः दिसूं लागते. कधीं कधीं दगडीच्या दगडचा कोरलेला ठसा घेऊन त्यांत थित्सिचा रस व हाडकांची राख यांचे केलेले लुकण घालून खंडोबाच्या टाकासारखे सपाट सांचे घेतात, व ते लांकडावर चिकटवितात; अथवा लाकडाचे गलथे व गोलच्या बसवून त्यांनीही कधीं कधीं शोभा आणतात. सिंहासने पहिल्यानें खोदून काढून त्यांजवर नक्षी करतात. त्याचप्रमाणें यति लोकांचें भिक्षापात्र हे पहिल्यानें खोदून त्याजवर नक्षी करतात. नक्षी केलेल्या सामानावरही लाखटलेलें काम करतात, व त्यांत विशेष शोभा आणण्याकरितां रंगारंगाचे कांचेचे तुकडे, व आरशाचे तुकडेही कधीं कधीं बसवितात,