पान:देशी हुन्नर.pdf/115

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ १०९ ]

ती गांवच्या तीर्थास नेण्याकरितां लागत असलेली एका प्रकारची असुरमुखी ढाल तयार करण्याबद्दल या गांवाची मोठी ख्याती आहे.

 निजामशाहींत रायचूर जिल्ह्यांत बैंगण पल्लीं गांवी होत असलेल्या लाखटलेल्या कामाची पुष्कळ लोक मोठी तारीफ करतात. बेदर येथील चांदीच्या कोंदण कामाप्रमाणे या गांवच्या लाखटलेल्या कामाचा लग्नांत नवऱ्या मुलास अहेर होत असतो. बैंगणपल्ली येथील कामाचे दोन प्रकार आहेत. एक 'मुना बथि' आणि दुसरें 'लाजवर्दि' 'मुनाबथि' कामांत शिंप्या किंवा बीड घेऊन त्याची वस्त्रगाळ पूड करतात. ही पूड सरसा सारख्या कांहीं चिकट पदार्थात कालवून तिचे थरावर थर देऊन लांकडावर वेलबुट्टी सोडवितात. या वेलबुट्टीवर सोन्याचा वर्ख चिकटवून त्याच्यावर मधून मधून रंग भरून नंतर रोगण चढवितात. असल्या कामाची किंमत मात्र फार पडते. त्याचें कारण असें सांगतात कीं निजामशाहींतील जहागीरदार लोक या कारागीर लोकांपासून 'कोंबडी पटी' उपटीत असतात. मोगलाईच ती!

 आसाम प्रांती मुसलमान लोक लांकडाचीं खेळणीं तयार करतात. त्यांजवर रंगीबेरंगी लाख चढवून तीं शेंकड्याच्या हिशोबानें विकतात. याच गांवीं एक कारागीर शंभर बाणांसह एका प्रकारचें बांबूचें धनुष्य तयार करून तीन रुपये दोन आण्यास विकतो. बाणाच्या एका टोंकास लोखंडाचें पातें व दुसऱ्या टोंकास कागदाचा पोकळ शंकु बसविलेला असतो.

 ब्रह्मदेशांतही दोन प्रकारचें लाखटलेले काम तयार होतें. एक सुपें टोपल्या वगैरे करून त्यांवर केलेले काम आणि दुसरें लांकडावरील काम. या सामानाचे त्याच्या उपयोगाच्या संबंधानेंही दोन भाग करतां येतील. एक संसारांत लागणारें सामान, व एक परलोक साधनार्थ बौद्धधर्मी देवळांत व समाधींत लागणारें सामान, गेल्या खानेसुमारींत ब्रह्मदेशांत लाखटलेलें काम करणारे व तें विकणारे मिळून एकंदर सहाशें शहात्तरांचा आंकडा पडला आहे. सुपल्या व टोपलीवजा काम उत्तरप्रांतीं होतें. दक्षिण प्रांतीं लांकडाचे डबे, पेट्या वगैरे होतात. त्यांत ब्रह्मीलोकांस जेवण्या करितां एक मोठें परळ होत असतें. कांहीं कारागीर ताडपत्रीवर लिहिलेलीं धर्म पुस्तकें ठेवण्याकरितां पेट्या, घुमटाच्या आकाराच्या झाकणाच्या देवळांत नैवेद्य नेण्याच्या डब्या, व बुद्धाची मूर्ति ठेवण्या करितां सिंहासनें, आणि प्रभावळी तयार करितात. ब्रह्मीलोक तयार करितात त्यापेट्या काळ्या रंगाच्या असून त्यांजवर सोन्याच्या शाईनें नक्षी-