पान:दुखहरण (Dukkhaharan).pdf/98

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


पाळी चुकली तशी माझं धाबं दणाणलं. आम्ही तीन मुलांवर बाळ होऊ द्यायचं नाही म्हणून नवरा-बायको म्हणून संबंध ठेवणं बंद केलं होतं.
 दिवसा डोळ्यांपुढे काजवे चमकायला लागले. पोरं दिसू लागली. माझी मलाच किळस वाटू लागली. मी नारायणाशी संबंध टाळू लागले... त्याला सर्व सांगितलं तसं त्यानं परत मदतीचा हात पुढे केला... क-हाडला जाऊ... पाडू... काळजी करू नगंस. मी मेल्याहून मेली झाले होते. गावाकडे जायचं निमित्त करून कराडला गेले. पोट पाडलं; पण गावी जायचं धाडस होईना... मग आम्ही ढेबेवाडीत ओळखीच्या ठिकाणी खोली केली... नारायण येऊन जाऊन राहायचा... मी घरात कोंडून घेतलं होतं.
 तोंड दाखवायचं नाही म्हणून बि-हाड बदलत राहिलो. पोरं दिसायची सारखी डोळ्यांपुढं... पण काय तोंड दाखवणार? घरी... गावी माझा बभ्रा झाला होता... पळून गेली म्हणून... नारायणवर संशय होता पण दुम नाही। लागायचा. नारायण कॉन्ट्रॅक्टिंग करतो म्हणून गावोगावी फिरायचा... त्याला इचारायचं कुणाचं धाडस व्हायचं नाही. त्यानं यापूर्वी दोघांचा निकाल लावला, अशी वदंता होती. हे सारं मला नंतर उमजत गेलं... म्हणजे त्याच्याच बरळण्यातून समजून आलं. आताशा तो घरी आणून प्यायला लागला, तसं माझं डोकं फिरलं.
 गेली आठ-नऊ वर्षं मी त्याचं ऐकत आले... तो पण माझं... पण हल्ली तो बाजीराव झाला... गुरगुरू लागला... हात टाकू लागला तशी माझी मर्जी अन् मन मेलं. मी त्याला हात लावू द्यायची नाही. तसा तो चेकाळायचा... ‘दोघांना संपवलं, तुझं काय घेऊन बसलीस?' म्हणू लागला. तसं माझं अवसान संपलं. घर, दार सारं गमावलेली मी... मी । रंगान सावळी होते म्हणून वर्गातल्या मुली ईनं काळ्या तोंडाची म्हणायच्या... आता तर मीच मला तसं म्हणू... समजू लागले... नारायण नसला की तासन्तास आरशासमोर उभं राहून बोलत राहायचे... माझी मलाच घृणा... किळस वाटून यायची, त्या भरात एकदा मी स्वतःला पेटवून घेतलं... तडफड... आरडाओरड्यांनी शेजारच्यांनी कितीतरी वेळा प्रयत्न करूनही दरवाजा निघाला नाही. तेव्हा मी बेशुद्ध झाले होते म्हणे... मला ते काहीच कळलं नाही. शुद्ध आली तेव्हा माझे दोन्ही हात अंगाला चिकटलेले होते.

 बरी झाले तसे नारायणनं घरी आणलं... मी ब्लाऊज घालू शकत नव्हते. वडरांच्या बायकांसारखं बिनचोळीचं मला राहावं लागायचं. नाही

दुःखहरण/९७