पान:दुखहरण (Dukkhaharan).pdf/97

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


 अकरावीच्या निकालाची पण वाट पाहिली नाही घरच्यांनी दिला बार उडवून तसं माझं जग बदललं, निराळं झालं. हे प्राथमिक शिक्षक होते. जिल्ह्यात बदली असायची. गौरगाव, खरसुंडी अनेक ठिकाणी बदल्या झाल्या. आम्ही बि-हाड करून राहायचो. पंधरा वर्षांच्या संसारात दोन मुलं, एक मुलगी झाली. सुखाचा संसार होता. दृष्ट लागावी असा. मुलं अन् हे शाळेला जायची. मी रिकामी... मन रिकामं... ते केव्हा भुताचं झालं समजलं नाही.

 तेव्हा आमचं बि-हाड तासगावला होतं. शेजारी नारायण कॉन्ट्रैक्टर राहायचा. यांच्याच वयाचा. आमच्या गल्लीत त्याचा रुबाब असायचा. आम्हाला सारी मदत करायचा. मला मोठं आश्चर्य वाटायचं... याला आपली अडचण कशी कळते? हा अगोदरच ती दूर करायचा. मुलांचं लाड करायचा. यांनी जे मला करावंसं वाटायचं ते तो करायचा... मला सिनेमा आवडायचा... फिरायला आवडायचं. यांची कायम नकारघंटाच, मला नटायला आवडायचं... हे म्हणायचे ‘‘बाईमाणसानं साधं राहावं... तू तीन लेकरांची आई आहेस... शिक्षकाची बायको तू...' मला ते नाही पटायचं... इच्छा मारून जगणं म्हणजे मरणं वाटायचं. नारायणचं वागणं, बोलणं, विचार माझेच वाटायचे. हे गेले की नारायण घरी यायचा. तास तास बोलत बसायचा... मला माझं जग मिळायचं. इच्छेच्या पलीकडे सर्व व्यर्थ वाटायचं... शेजारपाजारच्या बायका नारायणबद्दल वाईटवंगाळ बोलायच्या. मला वाईट वाटायचं... म्हणायच्या, ‘पैशावर, रूपावर जाऊ नगंस... लई द्वाड हाय त्यो... त्येला बाई... बाटलीचा नाद हाय... बोलण्यावर भुलू नगंस!' मला पटायचं; पण वळायचं नाय... त्याची नशा झाली होती। माझ्यावर. मुलांच्या विचारानं मागं सरायची; पण मन म्होरं व्हायचं. एकदा हे ट्रेनिंगला गेले होते. मुलं गावी होती. मी घरच्या कामासाठी म्हणून बि-हाडी आले होते. तसा नारायण आला, सिनेमाला जाऊ म्हणाला. मी नाही म्हणताना बळेनं चल म्हटला. मी मग काय वाटून हो म्हटलं, पण गावात नको. सांगलीला जाऊ म्हटलं... तसा तो हरखला. आम्ही सिनेमा बघितला, हॉटेलमध्ये जेवलो. उशीर झाला. गावाकडं परतायच्या मुक्कामाच्या गाड्या पण चुकल्या. काय करावं कळना, स्टेंडातच बसू म्हटलं, तर म्हटला गावाकडचं कोण आलंबिलं तर... आपण लॉजमधी जाऊ... पहिल्या गाडीनं तू तुझ्या गावी जा... मी माघारी जातो म्हणाला. इलाज नव्हता. स्टॅडच्या समोर लॉज होता. तिथं राहिलो... रात्री जे होऊ नये ते झालं. पुढे मला त्याचा घोर लागला. सांद मिळताच आम्ही भेटत राहिलो.

दुःखहरण/९६