पान:दुखहरण (Dukkhaharan).pdf/99

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


म्हणायला छाती-पाठच भाजली होती. वरून कुणाला काहीच कळायचं नाही. ढेबेवाडी सोडून आता आम्ही गारगोटीकडे आकुर्डे गावी एकाच्या ओळखीनं बि-हाड केलं. दोन्ही हात कोपरापर्यंत चिकटलेले होते. कोपरापासून हात हालायचे. माझं मी सगळं करू शकायचे; पण अपंगच झाले होते. मन मनातल्या मनात म्हणत होतं... “कोण होतीस तू.. काय झालीस तू!' इकडे बि-हाडात धान्य भरून हातावर हजार रुपये ठेवून नारा गेला. जाताना सांगून गेला की, मला गुजरातचं कॉन्ट्रैक्ट मिळणार हाय. महिनाभर काय येता येणार नाय!, मी महिना वाट पाहात काढला. दोन महिने झांल तरी पत्ता नाही. म्हणून गावाकडे चौकशी केली; तिथंपण तो बेपत्ताच होता. मी निराधार झाले होते... दोन वेळची भाकरी महाग झाली होती. मजुरी पण करू शकायची नाही... शेजारच्यांनी वाढून महिना काढला. रोज लोकांच्या दारात जाणं जिवावर आलं. मी आजवर राजस राहिले. भीक मागणं मरण वाटू लागलं. कंटाळून विहीर, नदीवर जीव द्यावा वाटायचं... पोरं दिसायची अन् नको वाटायचं!
 गावात एक अंगणवाडी सेविका होती. तिच्याकडून मला महिला आधारगृहाची माहिती मिळाली. तिनंच पुढे करून मला शासकीय आधारगृहात दाखल केलं. तिथं पाटील बाई सुपरिटेंडेंट होत्या. आम्ही त्यांना ताई म्हणायचो. ताईंनी माझी कहाणी ऐकली... माझी स्थिती पाहिली अन् मला संस्थेतच काम दिलं. संस्थेतील बाकी मुली, बायको कोण बाहेर शिकायला, कोण आयटीआयला, कोण नोकरीला जायच्या. काही संस्थेतच असायच्या. इतर कर्मचारी बरे नव्हते; पण ताईमुळे सगळं पोटात घेत आम्ही राहत असू. इतर मुली, महिलांची प्रत्येकीची कथा म्हणजे एकेक सिनेमाच असायचा. काही केवळ अनाथ असायच्या. त्याचं फार वाईट वाटायचं. सोसण्याशिवाय पर्याय नसायचा. वाटायचं माणसानं अनाथ असू नये... जात नाही, नाव नाही, नातं नाही... आपण म्हणजे आपले जग आमचं बरं होतं. वळचणीला जायचं म्हटलं तर जागा होती; पण आमचा वनवास आम्हीच निर्माण केलेला. त्याचं वाईट वाटायचं.

 मी एकदा बाईंना माझ्या मनातली इच्छा बोलून दाखविली... ‘बाई... ऑपरेशन करून हात होतील का हो मोकळे... ब्लाऊज तरी घालता येतील.' ही कल्पना यायला पण कारण घडलं होतं. पेपर वाचताना ‘प्लॅस्टिक सर्जरीचे चमत्कार' म्हणून एक लेख पाहिला होता. बाईंना तो दाखविला. प्रयत्न करूया म्हणाल्या. पण खर्चाचं काय? बघते म्हणाल्या;

दुःखहरण/९८