पान:दुखहरण (Dukkhaharan).pdf/93

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


मी मुलांना घेऊन संस्थेत राहू लागले. पडेल ते काम करू लागले. घर, दार, नवरा सारं विसरवलं संस्थेनं. संस्थाच माझं माहेर झालं... खरं माहेर!
 मी कोल्हापूरच्या बालकल्याण संकुलात जातानाच मनाशी ठरवलं होतं की सासर, माहेर माझ्यासाठी संपलं, मेलं. संस्थेत प्रवेश केला नि मी एका निराळ्यात जगात आले असं वाटू लागलं. घरी पाच-दहा लोकांत राहायची सवय... इथं चांगली तीनशे मुलं, मुली, बायका. प्रत्येकीची तन्हा वेगळी. एकाच ठिकाणी अनेक संस्था पण कशा सुतासारख्या चालायच्या. तेव्हा दादा संस्था पाहायचे. त्यांचं सगळ्या गोष्टींकडे बारीक लक्ष असायचं. स्वच्छता, जेवण, मुलं नीटनेटकी, दवाखाना, औषधपाणी सारं जिथलं-तिथं व जेव्हाचं तेव्हा. ही १९९२-९३ ची गोष्ट असेल. पहिला आठवडा मी बसूनच काढला. मग दादांनी तेव्हा लहान मुलांच्या आंघोळीसाठी गरम पाण्याची सोय करायचं ठरवलेलं. ती जबाबदारी माझ्यावर सोपवली. मी मन लावून करू लागले. अंघोळ, कपडे, केस विंचरणं सारं करायचे... मुलं उजळली... सर्व माझं कौतुक करू लागले. मग पाळणाघराकडे नेमले. संस्थेत टाकलेली, सोडलेली मुलं असायची. आमच्या सांगलीच्या हॉस्पिटलपेक्षा इथं सोय चांगली होती. डॉक्टर, नर्स, जेवण, राहणं, खेळणी, रेडिओ, टी.व्ही... सर्व म्हणजे सर्व! मुलांना फुलासारखे जपायचे. दादांचं ऑफिस शेजारीच होतं. बाळ रडलं तरी यायचे... घ्यायचे. त्यामुळे सर्व जागृत असायचे. मला मग पगार सुरू केला. काही वर्षांनी वाढला, तशी मी संस्थेबाहेर मुलं घेऊन राहू लागले.

 या संस्थेनं माझ्याबरोबर अशा कितीतरी निराधार मुलं-बायकांना स्वतःच्या पायावर उभं केलं होतं... कितीतरी मुलं, मुली, स्त्रिया ... शोभा, जयश्रीबाई, श्यामा, सुतारबाई, रजाक, निलेश, विकास, यशवंत किती नावं सांगू? मला मोठं आश्चर्य वाटायचं... रक्ताचं नातं असलेले काखा वर करतात... इथं कोण कुणाचं नसतं... पण किती माया... किती विचार.. लक्ष. प्रत्येकाचा प्रश्न वेगळा. प्रत्येकाची सोडवणूक वेगळी. मी खोली करून राहिले तरी संस्थेचा खाऊ घरी यायचा... मुलांसाठी. जन्मदाते। विचारत नव्हते... संस्था खरी आय... माय होती. पगार वाढला तसा मी स्वतःचं गहाणवट घर घेऊन राहू लागले. घरचे बाहेरून चौकशी करत राहायचे, मला आश्चर्य वाटायचं. नंतर कळलं की दादाच त्यांना सांगायचे... धीर द्यायचे... अन् मला आधार!

दुःखहरण/९२